Breaking News

मुंबई महानगरात ‘केबल कार’, प्रकल्पासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाची आवश्यकता मांडण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सादरीकरणानंतर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ‘पर्वतमाला परियोजना’ अंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप वे विकसित करण्याचा मानस असून यासंदर्भातील विकास आराखडा तयार करुन तत्वत: मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यादृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेणपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, नवीन रस्ते व रेल्वे सेवा, प्रदूषण याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याची भूमिकाही यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.

मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरानसारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘रोपवे’च्या माध्यमातून ‘केबल कार’ प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *