अंधारेंच्या टीकेला बच्चु कडूंचे प्रत्युत्तर, आमची स्वतःची पानटपरी..कुठे लावायची ते आम्ही ठरवू आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार आणि पाठिंबा देणारे १० अपक्ष आमदारही बंडात सहभागी झाले. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुतच आहे. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा पक्ष बांधणीच्या उद्देशाने शिवगर्जना यात्रा सुरु केली असून ही शिवगर्जना यात्रा घेऊन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अमरावतीत पोहचल्या होत्या, त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत सुषमा अंधारे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकेची झोड उठविताना बच्चु कडू यांच्यावरही निशाणा साधताना, देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या हाताने बच्चू कडूंचा गेम करत आहेत, असं विधान केलं.

अंधारे यांच्या या टीकेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले, आम्ही वार करतो. आम्ही फसत नाही. आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो, असं प्रत्युत्तर देत आमची स्वतःची पानटपरी आहे. ती पानटपरी कुठे लावायची ते आम्ही ठरवू असेही म्हणाले.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, आमच्या पक्षाचं नाव प्रहार आहे. बाकीच्या पक्षाचं नाव प्रहार आहे का? आम्ही वार करतो. आम्ही फसत नाही. देवेंद्रजी आम्हाला मदतच करणार आहेत. केवळ एक फोन केला म्हणून कुणी गुवाहाटीला जातं नाही. आम्ही नुकतंच १५० कोटींचा निधी मिळवला. यामध्ये रस्ते विकासासाठी कालच १२७ कोटी रुपये मंजूर केले. अचलपूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम आली आहे. मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे. आमची पंधरा वर्षे अशीच गेली. आम्ही सत्तेच्या बाहेर पडून आंदोलनं केली. भांडणं केली. त्याकाळात मतदारसंघ थोडा मागे राहिला. आता आपण चार प्रकल्प मंजूर केले आहेत. शेवटी मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा असतो.

शिंदेंसोबत गुवाहाटीला जाण्याबाबत विचारले असता बच्चु कडू म्हणाले, राहिला प्रश्न गुवाहाटीला जाण्याचा… तर गुवाहाटीला जायचं की नाही? हे कोण ठरवणार? गेली २० वर्षे आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे कुठे जायचं आणि कुठे नाही? हे आम्ही ठरवणार… आम्ही स्वत:च्या अंगावर केसेस घेतल्या. आम्ही लोकांचा मार खाल्ला. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर बसायचं? हे आता तुम्ही सांगणार का? असा खोचक सवालही उपस्थित केला.

बच्चू कडू पुढे म्हणाले, शिवसेनेचा आणि आमचा संबंध कुठे आला इथे.. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आमचा स्वत:चा पक्ष आहे. स्वत:ची मेहनत आहे. आमची स्वत:ची पानटपरी आहे. ही पानटपरी कुठे लावायची, हे आम्ही ठरवू… त्यामुळे आम्हाला कुणी गद्दार म्हणण्याचं शहाणपण शिकवू नये. आम्ही गद्दारी केली नाही. माझ्या प्रचारासाठी सभा घ्यायला उद्धव ठाकरे आले नव्हते. तरीही तुम्ही आम्हाला गद्दार कसं म्हणू शकता? असा सवालही केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *