Breaking News

मोदी-भाजपा विरोधात २६ राजकिय पक्षांचा “इंडिया” लढणार पुढील बैठक होणार मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वाढत्या एककल्ली कारभाराच्या विरोधात देशातील जवळपास २६ सर्वपक्षिय विरोधकांची बैठक आज कर्नाटकातील बंगरूळू येथे पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोठी घोषणा करताना विरोधी पक्षांची आघाडी आता यापुढे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूझिव अलायन्स अर्थात इंडिया नावानं लढणार असल्याचे जाहिर केले. तसेच या अलायन्सची पुढील बैठक मुंबईमध्ये होईल, असं देखील म्हणाले.
पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, देशातील २६ राजकीय पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. ही बैठक लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची आहे आपण विविध मुद्यांवर चर्चा केली आहे. आम्ही यापूर्वी यूपीए नावानं कार्यरत होतो. आम्ही यापुढं इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूझिव अलायन्स अर्थात इंडिया या नावानं लढणार आहोत. याला सर्वांनी मान्यता दिल्याचे सांगत त्यासाठी ११ सदस्यांची समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. आमची पुढील बैठक महाराष्ट्रातील मुंबईत होणार आहे. समन्वय समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा मुंबईत करणार असून प्रचारमोहिमेसाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. याचं काम दिल्लीतून होणार असल्याचेही सांगितले.

आम्ही भाजपाविरोधातील लढाईत नक्की यशस्वी होऊ, असे वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंगळुरुतील विरोधकांची आजची बैठक यशस्वी ठरल्याचा दावा केला. आम्ही वेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र कसे येणार, असा प्रश्न विचारला जातो. पण राजकारणात वेगळ्या विचारधारा असल्या पाहिजेत. यालाच तर लोकशाही म्हणतात. हा फक्त आमच्या पक्षाचा प्रश्न नाही. काहींना वाटतं की, आम्ही कुटुंबासाठी लढत आहोत. होय, हा देश आमचं कुटुंब आहे, आमची लढाई ही देशातील हुकूमशाही विरोधात आहे. देशातील स्वातंत्र्य धोक्यात आल्याने आम्ही लढत आहत. ही लढाई एखादा पक्ष किंवा व्यक्तीविरोधात नाही तर निती आणि हुकूमशाहीविरोधात आहे. एक व्यक्ती किंवा एक पक्ष हा देश होऊ शकत नाही. या लढाईत आम्ही नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सध्याच्या वातावरणामुळे देशातील जनता घाबरली आहे. मात्र, मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की, ‘तुम्ही घाबरु नका, आम्ही आहोत’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनीही आपले विचार मांडले. आमची आजची बैठक खूपच यशस्वीरित्या पार पडली. आमची लढाई ही भाजपाच्या विचारधारे विरोधात आहे. ही विचारधारा देशावर आक्रमण करत आहे, देशात बेरोजगारी वाढत आहे, संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती एकटवत आहे. देशाचा आवाज दडपला जातोय, यासाठी ही लढाई आहे. त्यामुळेच विरोधकांच्या आघाडीचे नाव INDIA असे ठेवण्यात आले. ही लढाई नरेंद्र मोदी आणि इंडियात आहे, दोन विचारधारांमध्ये आहे. INDIA समोर कोणीही उभा ठाकतो, तेव्हा त्यांचं काय होतं, हे सगळ्यांना माहिती आहे, असा सूचक इशाराही दिला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *