Breaking News

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र सायबरचा गौरव

डॉक्युमेंट मँनेजमेंट विभागातील दोन पुरस्काराने सन्मानित

मुंबई : प्रतिनिधी

माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल महाराष्ट्र पोलीसांच्या महाराष्ट्र सायबर प्रकल्पाला देशपातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले असून कोची येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या समारंभात काल हे पुरस्कार महाराष्ट्र सायबरला प्रदान करण्यात आले. कोची येथे झालेल्या द ओपन ग्रुप अवार्ड फॉर इनोव्हेशन अँड एक्सलन्स परिषदेत महाराष्ट्र सायबरला डिजिटल सिक्युरिटी विभागातील मानाचा ‘द प्रेसिडेंटस ॲवार्ड’ प्रदान करण्यात आला तर अॅम्बिस प्रणालीस इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या ‘टेक्नॉलॉजी सभा ॲवार्ड’च्या समारंभात डॉक्युमेंट मॅनेजमेंट विभागातील पुरस्कार देण्यात आले.

जागतिक द ओपन ग्रुपच्या वतीने काल सायंकाळी कोचीमध्ये द ओपन ग्रुप अवार्ड फॉर इनोव्हेशन अँड एक्सलन्स परिषद झाली. या परिषदेत महाराष्ट्र पोलीसांच्या महाराष्ट्र सायबरच्या डिजिटल क्राईम युनिटला डिजिटल सिक्युरिटी श्रेणीत मानाचा द प्रेसिडेंट ॲवार्ड घोषित झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पायरसी रोखण्यासाठी व माहितीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबरने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल या पुरस्कारने घेण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग, महाराष्ट्र सायबरचे अधीक्षक बाळसिंग रजपूत यांच्यावतीने पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, पोलीस शिपाई विवेक सावंत यांनी हा पुरस्कार स्विकारला.

माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या शासकीय कार्यालये, संस्था, संघटना यांना इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या टेक्नॉलॉजी सभा ॲवार्डने गौरविण्यात येते. हा कार्यक्रम आजपासून कोचीत सुरू झाला असून गुन्हेगारांची माहिती डिजिटल स्वरुपात गोळा करण्याच्या अॅम्बिस प्रणालीच्या अनोख्या कामाची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली. या प्रणालीस बेस्ट डॉक्युमेंट मॅनेजमेंट श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅम्बिस प्रणालीमध्ये गुन्हेगारांचे डोळ्यांचे स्कॅनिंग, चेहऱ्याची ओळख, सुमारे साडेसहा लाख अंगुलीमुद्रा डिजिटल स्वरुपात साठविण्यात आल्या आहेत.यामुळे काही क्षणात गुन्हेगारांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.  कोचीतील या कार्यक्रमात महाराष्ट्र सायबरचे पोलीस निरीक्षक अविनाश जावीर, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, सहायक पोलीस निरीक्षक रुपाली गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जाधव यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *