Breaking News

आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी राजेश टोपे यांची मोठी घोषणा, चौकशी होणार सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली घोषणा

मराठी ई-बातम्या टीम
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीवरून राज्याचे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया वादात सापडली असताना आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. पेपर फुटीवरून तब्बल दोन वेळा आरोग्य विभागाकडून परिक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे क आणि ड पदासाठीची भरती प्रक्रिया रखडली आहे. यापार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला असता त्यास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर देत मोठी घोषणा केली.
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड या पदासाठी झालेल्या कथित गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, तसेच फेरपरीक्षा घेतल्यास उमेदवारांकडून कोणातेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी आरोग्य विभागातील पदे शंभर टक्के भरली जावीत ही शासनाची भूमिका आहे. ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. यात परीक्षापद्धतीत बदल करावा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा, याबाबत सांगोपांग विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
परीक्षा घेण्यासाठी संस्था निश्चित करतांना विहीत कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला होता. सामान्य प्रशासनाच्या निकषांनुसार सर्व तपासणी करण्यात आली होती. संबधित संस्था काळ्या यादीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षासंदर्भात चौकशी सुरु असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई होईल. त्याचबरोबर उमेदवारांना परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही, त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, आदिंनी सहभाग घेतला.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *