Breaking News

९५ टक्के बालक एचआयव्ही मुक्त पुरस्कार विजेत्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.रेखा डावर यांचा दावा

एचआयव्हीग्रस्त मातांपासून होणाऱ्या अर्भकांना एचआयव्ही होऊ न देणे, म्हणजेच एचआयव्हीमुक्त नवीन पिढी जन्माला आणण्याचे कार्य करत असल्याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे आजस्थितीला ९५ टक्के बालक एसआयव्ही मुक्त असल्याचा दावा पुरस्कार विजेत्या स्त्री रोग तज्ञ डॉ .रेखा डावर यांनी केला.

तसेच केंद्र शासन आणि राज्य शासन तसेच माझे सहकारी यांच्या सहकार्याने हे कार्य करण्यास यश मिळाल्याची भावनाही त्यांनी यावेळी  बोलताना व्यक्त केली.

मंत्रालयात जागतिक एड्स दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित एका  कार्यक्रमात डॉ.डावर यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्यावतीने आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव  डॉ.प्रदिप व्यास,संचालक डॉ. सतिश पवार, युएसआयडीच्या एचआयव्ही डिव्हीजनच्या भारतातील प्रमुख सेरा हैदारे आदी उपस्थित होते.

डॉ. डावर यांनी गेली ४० वर्षे महाराष्ट्रात स्त्री आरोग्य व वैद्यकीय शिक्षणात भरीव कामगिरी केली आहे. अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊनही सामाजिक कार्याची जाण असलेल्या डॉ. डावर या भारतातील जनतेच्या सेवेसाठी परतल्या. राज्यात औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी सेवा दिली आहे. कुटुंब नियोजन या शासनाच्या कार्यक्रमातही त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. जे.जे. रूग्णालयात त्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

प्रभावी कार्य

१९९९ पासून डॉ. डावर यांनी आईकडून बाळास होणारा एचआयव्ही रोखण्याचा (PMTCT) कार्यक्रम केंद्र प्रशासन (नाको) बरोबर सुरू केला.त्यांच्या नेतृत्वाखाली जे.जे.रूग्णालय (PMTCT) साठी  ‘सेंटर ऑफ एक्सलंसम्हणून घोषित करण्यात आले.  नवीन पिढीला मातेकडून एड्स होऊ नये यासाठी गेली १८ वर्षे त्या कार्यरत आहेत. त्यामध्ये ९५ टक्के बालकांना एचआयव्ही मुक्त करण्यात यश प्राप्त केले आहे. गेल्या तीन वर्षातील सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून सर्व बालके आज एचआयव्ही मुक्त आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक एड्स निवारण (UNAIDS) यांनीही घेतली. त्या अनेक केंद्रस्तरीय समित्यांवर सक्रीय आहेत.आजपर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

जागतिक एड्स दिनानिमित्त त्या म्हणाल्या, आजच्या तरूण-तरूणींमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी किशोरवयीन पाल्यांना याबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात राज्यात आपल्याला एचआयव्ही  रूग्ण आढळणार नाहीत. एचआयव्हीचे रूग्ण जेव्हा भारतात आढळून आले त्यावेळच्या परिस्थितीनुसार एक भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या टेस्ट ॲण्ड ट्रीट पॉलिसीमुळे मोठ्या प्रमाणात रोगावर नियंत्रण आणू शकलो. शासकीय रूग्णालयात प्रतिबंधात्मक औषधे आणि उपचार मोफत दिली जात असल्याचेही डॉ. डावर यांनी सांगितले.

Check Also

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *