Breaking News

शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स तब्बल ११९० अंकाने कोसळला ओमायक्रॉनचा परिणाम शेअर बाजारावर

मराठी ई-बातम्या टीम
कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जगातील बिघडलेली परिस्थिती आणि जागतिक बाजारातील कमजोरी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सेन्सेक्स तब्बल १,१८९.७३ (२.०९%) घसरून ५५,८२२.०१ वर बंद झाला. निफ्टी देखील ३७१.०० (२.१८%) ने १६,६१४.२० वर घसरला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल ११ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.
बाजारातील घसरणीची तीन मोठी कारणे
ओमिक्रॉन व्हायरसचा धोका
कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन झपाट्याने पसरत आहे. ओमिक्रॉनचा धोका पाहता प्रवासी निर्बंधापासून ते लॉकडाऊनपर्यंत लादण्यात येत आहे. नेदरलँड्सने नुकतेच लॉकडाऊन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची चिंता वाढली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले
विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) गेल्या ४० दिवसांत बाजारातून ८०,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत. एकट्या डिसेंबरमध्ये एफआयआयने रोख बाजारात २६,००० कोटी रुपयांची विक्री केली. या वर्षातील ही सर्वात मोठी मासिक विक्री आहे. १७ डिसेंबर रोजी FII ने रोख बाजारात २,०६९ कोटी रुपयांची विक्री केली होती.
महागाईची चिंता
याशिवाय, वाढत्या महागाईबाबत जगभरातील प्रमुख केंद्रीय बँकांच्या इशाऱ्यांमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. चलनवाढीचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवणारी बँक ऑफ इंग्लंड ही जगातील पहिली मोठी केंद्रीय बँक आहे. यूएस फेडरल रिझर्व्हनेही महागाई हे चिंतेचे प्रमुख कारण असल्याचे नमूद केले आहे.
दिवसभरात सेन्सेक्स १८७९ अंकांनी घसरला
सेन्सेक्स ४९४.४८ अंकांच्या घसरणीसह ५६,५१७.२७ वर उघडला. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स १८७९.०६ अंकांनी घसरून ५५,१३२.६८ वर पोहोचला. तथापि, नंतर बाजारात थोडीशी रिकव्हरी झाली आणि तो ११८९.७३ (२.०९%) च्या घसरणीसह ५५,८२२.०१ वर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स ५७,०११.७४ वर बंद झाला.
निफ्टी १६०.९५ अंकांच्या घसरणीसह १६,८२४.२५ वर उघडला. दिवसाच्या व्यवहारात तो ५७५ अंकांनी घसरून १६,४१०.२० वर पोहोचला. बाजाराच्या शेवटच्या तासांमध्ये थोडी खरेदी झाली आणि निफ्टी खालच्या स्तरावरून सावरला आणि ३७१.०० (२.१८%) च्या घसरणीसह १६,६१४.२० वर बंद झाला.
अवघे २ शेअर्स वधारले
सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअर्स घसरले. फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर (१.७०%) आणि डॉ. रेड्डी (१.०२%) शेअर्स वधारले. टाटा स्टील (५.२०%), SBI (३.९७%), इंडसइंड बँक (३.९३%), बजाज फायनान्स (३.८९%) आणि HDFC बँक (३.१४%) मध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.

Check Also

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *