Breaking News

आर्थिक निर्बंधामुळे रशियाच्या आर्थिक अडचणीत वाढ: व्याज दरात मोठी वाढ रशियाच्या मध्यवर्ती बँकेने वाढविले व्याज दर

युक्रेनवर केलेल्या चढाईमुळे संबध जगभरातून रशियाच्या विरोधात वातावरण निर्मिती होत असून अनेक देशांकडून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात येत आहेत. त्यामुळे रशियाच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. तसेच रशियाचे प्रमुख चलन असलेल्या रूबलचा दरही डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून रशियन मध्यवर्ती बँकेने व्याज दर ९.५ टक्केवरून २० टक्के इतका वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रविवारी लष्कराला युक्रेनविरोधात अण्वस्त्र सज्ज होण्याचे आदेश दिल्यानंतर रुबलची ऐतिहासिक घसरण होत त्याचा भाव एका डॉलरला १२० इतका घसरला. युरोप व अमेरिकेनं रशियाविरोधात आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर रशियाचे चलन आधीच घसरणीच्या मार्गावर होते ते आणखी घसरलं.

या सगळ्याचा परिणाम प्रचंड महागाईत होणार हे स्पष्ट असल्याने रशियाच्या मध्यवर्ती बँकेने महागाई वाढीचा दर चार टक्क्यांवर ठेवण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आणि त्यामुळेच आर्थिक आणीबाणी म्हणून व्याजाचे दर प्रचंड वाढवले. यामुळे रुबलचे अवमूल्यन व महागाईचा धोका कमी होईल अशी आशा बँकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रशियन नागरिकांच्या बचत केलेल्या पैशाचं अवमूल्यन या निर्णयामुळे होणार नाही व त्यांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज मिळेल व परिणामी आर्थिक स्थैर्य राहील असा अंदाज आहे. यापूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनकडून क्रिमियाचे विलिनीकरण केले होते तेव्हा २०१४ मध्ये १७ टक्क्यांच्या वर व्याजाचे दर झाले होते. आता युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं रशियातील बँकांचा स्विफ्ट प्रणालीशी संबंध तोडल्यानंतर तीच वेळ आली आहे.

रशियाच्या सांगण्यानुसार युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्यात आली असून प्रदेश गिळंकृत करणे हा हेतू नाहीये. या देशाच्या लष्करी सामर्थ्याचा बीमोड करणे आणि विघातक राष्ट्रवादी शक्तींना नेस्तनाबूत करणे हा आपला उद्देश असल्याचे रशियाकडून सांगण्यात येत आहे.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *