Breaking News

कोरोना लॉकडाऊन आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी मानसिकतेसाठी मानसोपचार तज्ञ डॉ हर्षल थडसरे यांचे खास सल्ले

आता ही गोष्ट सर्वाना माहित आहे कि, जगभर कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. आपल्या भारतात आणि त्यात ही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण, त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. परंतु ह्या अतिसूक्ष्म विषाणूने एक अदृश्य भीती देखील निर्माण केली आहे. भीती आणि बेचैनी वेगवेगळ्या प्रकारची जसे कि,  हा आजार मला किंवा माझ्या घरातल्याना झाला तर?  किंवा ह्या टाळेबंदी च्या काळात अनेकांना पडलेला प्रश्न कि, आता पुढे काय होणार? असे किती दिवस आपण घरात अडकून पडणार?  किंवा आता घरात राहून राहून कंटाळा आलाय… जाम बोर किंवा उदास वाटतंय…. याही पुढे जाऊन लोकांना वेगळ्याच गोष्टीचा तणाव जाणवतोय…. अनामिक भीती किंवा बेचैनी…जी नेमकी कोणत्या गोष्टी मुळे आहे हे नक्की सांगता येत नाही. मग आपण कोणत्या मानसिक आजाराने तरी ग्रस्त होत नाहीये ना? असे एक ना अनेक प्रश्न. या प्रश्नाची उत्तरे  देण्यासाठी हा लेखनप्रपंच…

या लेखात आपण पाहणार आहोत कि, आपल्याला जाणवनाऱ्या तणावाची कारणे काय आहेत?  हा तणाव टाळता येऊ शकतो का? त्यासाठी काय करायला हवं आणि तज्ञांची मद्दत केव्हा घ्यायला हवी?

आताच्या परिस्थितीत जेव्हा सर्व जगावर कोरोनाच संकट आहे, आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सगळे आपापल्या घरात बंदिस्त झाले आहेत,  तेव्हा थोडी चिंता किंवा भीती वाटणं साहजिक आहे. परंतु, जेव्हा ही चिंता किंवा भीती सतत जाणवते आणि त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाते तेव्हा त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. ह्या चिंतेचं महत्वाचं कारण हे आपल्यावर होणारा माहितीचा भडीमार हे असू शकता, जसा कि, व्हाट्सअँप फेसबुक इतर सोशल मीडिया आणि टीव्ही वर सतत मिळणारी कोरोनाची माहिती, ‘इतके रुग्ण वाढले आणि इतके दगावले,  आज नव्याने इथे रुग्ण मिळाला ‘. स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी आपण रोज मिळणाऱ्या माहितीने अवगत व्हायला हवं,  परंतु पुन्हा पुन्हा  व्हाट्सअँप पाहणं, दर २ मिनिटांनी येणारी ब्रेकिंग न्युज पाहणे , ह्या सगळ्याने आपली ही अनामिक भीती निर्माण होते आहे. तेव्हा आपण ही माहिती दिवसातून फक्त एकदा किंवा दोनदा जाणून घेतली तर,  आपण अपडेटेड राहू आणि अकारण चिंता ही नाही वाढणार. जर आपण वर्तमानपत्र वाचत असू तर पुन्हा पुन्हा टीव्ही वरील बातम्या पाहणं टाळाव , सोशल मीडिया म्हणजे व्हाट्सअँप, फेसबुक यांचा वापर कोरोनाची माहिती पाहण्यापेक्षा आपल्या नातेवाईक, मित्र मैत्रीण यांच्याशी गप्पा मारण्यासाठी करूयात. थोडक्यात प्रत्यक्षात दोन व्यक्तीमधील अंतर जास्त ठेवुयात परंतु संवाद चालू ठेवुयात. या अनामिक भीती आणि बेचैनी शिवाय, आता खूप लोकांना एक मोठा त्रास जाणवतोय ते म्हणजे लोकांना तंबाखू सिगारेट आणि दारू ही व्यसने मिळत नाहीये आणि त्यामुळेही प्रामुख्याने व्यसनाधीन लोकांना बेचैनी भीती जाणवतेय. काहींना व्यवस्थितीत झोप लागत नाही तर काहींचे हात पाय थरथर कापतयात, खूप चिडचिड होतेय. काही एकट्यात बडबड करतात तर काही इतरांच्या  अंगावर धावून येणे किंवा शिवीगाळ करणे असा करतात. ही सर्व लक्षणे व्यसनाधीन व्यक्तीमध्ये दिसून आली तर मात्र तज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचा ठरेलं. प्रामुख्याने नियमित दारूचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये ही लक्षणे दिसतात. परंतु जे लोक नियमित व्यसन करत नाहीत  आणि ज्यांच्यामध्ये वरील लक्षणे दिसत नाहीत, त्यांनी ही संधी समजून व्यसनांपासून दूर जाण्यासाठी प्रयत्न करावा. ह्या दरम्यान पुन्हा पुन्हा व्यसनाची तल्लफ होणे हा सुद्धा त्रास जाणवतो,  तेव्हा दारू पिणाऱ्या व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे जेणे करून तल्लफ दूर होईल. तंबाखू चे व्यसन करणाऱ्या व्यक्तीनी तंबाकू ऐवजी लवंग, बडीशेप, मनुके, अश्या पर्यायांचा विचार करावा. ज्यांनी नुकसान होणार नाही आणि तल्लफ दूर होईल.

या टाळेबंदी च्या काळात लोकांसाठी वेगवेगळ्या आर्थिक अडचणी आणि इतर सामाजिक समस्या (उदा. घरगुती हिंसाचार) यांचे प्रमाण ही वाढले आहे. पर्यायाने तणावाच्या कारणात भर पडली आहे. आणि कोरोना सोबत येणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या याकडेही विशेष लक्ष द्यायला हवं. खरंतर शक्यतो कोणतीही व्यक्ती, एका क्षणी आत्महत्येचा विचार करते आणि दुसऱ्या क्षणी आत्महत्या करते असा कधी होत नाही. बऱ्याच वेळा ती व्यक्ती बोलून दाखवते कि तिला ‘मरावं असा वाटतं’, किंवा अशी व्यक्तीच्या वागणुकीत बदल दिसतो जसे कि, एकटा एकटा राहणं, इतरांशी जास्त न बोलण, अचानक अथवा सतत चिडचिड करणे. हे बदल जर आसपासच्या व्यक्ती ओळखू शकल्या तर या आत्महत्या निश्चित रोखल्या जाऊ शकतात. एकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेली व्यक्ती पुन्हा निश्चित प्रयत्न करू शकते. तेव्हा अशा सर्व व्यक्तीची मदत मानसोपचार तज्ञ करू शकतात, त्यांच्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा.

यासगळ्यात ज्या व्यक्ती आधीपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहेत त्यांनी आपली औषधे चालू ठेवायला हवीत. प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटता नाही आला तरी दूरध्वनी वर संपर्क साधून शंका दूर करायला हव्या. कोरोनाचा प्रसार रोखता यावा ह्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातोय परंतु, पुन्हा पुन्हा गरज नसताना आणि बराच वेळ सतत हात धुणे, त्याच्यात बराच वेळ घालावणे, ही मंत्रचळेपणा किंवा ओसीडी या आजाराची लक्षणे असू शकतात. हा आजार काहींना आधी पासून असू शकतो आणि आता त्याची लक्षणे तीव्रतेने वाढतील किंवा नव्याने काही जणांमध्ये अशी लक्षणे दिसू शकतात.तेव्हा देखील मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. मुळात,  कोरोना किंवा इतर शारीरिक आजार तसेच मानसिक आजार हे कोणालाही होऊ शकतात, मग कमी शिकलेला असो कि जास्त, श्रीमंत असो कि गरीब, लहान मुलं किंवा वयोवृद्ध. तेव्हा गरज आहे ते काळजी घेण्याची आणि वेळेत तज्ञाचे मार्गदर्शन, उपचार करून घेण्याची.

शेवटी मानसोपचार तज्ञांचा सल्ला केव्हा घ्यायला हवा, जेव्हा खालीलपैकी एक किंवा अनेक लक्षणे सतत जाणवत असतील तर,

1) झोप कमी किंवा जास्त लागणे किंवा व्यवस्थित न लागणे

2) भूक कमी किंवा जास्त लागणे

3) वारंवार छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होणे

4) सतत वाईट किंवा उदास वाटणे

5) बेचैनी किंवा चिंता किंवा छातीत सततची धडधड

6) अनामिक भीती किंवा संशय

7) भास (उदा. कानात आवाज येणे किंवा डोळ्या पुढे व्यक्ती/ वस्तू दिसणे )

8) पुन्हा पुन्हा डोळ्यात पाणी येणे किंवा रडावेसे वाटणे

9) आत्महत्येचे विचार किंवा ‘मरून जाव’ असा वाटणे.

 

डॉ हर्षल थडसरे

MBBS, DPM(मुंबई), MIPS

मीरा हॉस्पिटल, मानसोपचार तज्ञ 

सोलापूर-9890149720

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *