Breaking News

६१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘संत तुकाराम’च्या प्रयोगात माऊलींचा भव्य सत्कार गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार

मुंबई : प्रतिनिधी

दादा महाराज मोरे माऊलींच्या ६१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने संगीत ‘संत तुकाराम’ या नाटकाच्या मंचावर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना माऊलींनी आपले विचार प्रकट केले. या सोहळ्याला गृहमंत्र्यांसोबत किर्तनकार आत्माराम महाराज बडे उपस्थित होते.

श्री वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामसुदर सोन्नर महाराज यांच्या प्रयत्नांनी या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दादर येथील शिवाजी मंदिर येथे पार पडलेल्या या सोहळ्यानंतर बोलताना सद्गुरू हभप दादामहाराज मोरे माऊली म्हणाले की, संगीत ‘संत तुकाराम’ हे नाटक जरी १०५ वर्षांपूर्वी लिहिलं असलं तरी आजची परिस्थितीही बदललेली नाही. त्यामुळे हे नाटक काळाची गरज आहे. विशिष्ट वर्गाकडे असणारी ज्ञानाची मिरासदारी तोडून वारकरी संतांनी ज्ञानाचा यज्ञ सर्वसामान्यांसाठी खुला केला. यात संत तुकाराम महाराजांचा फार मोलाचा वाटा आहे. पंडीतांविषयी आम्हाला आदर वाटतो, पण त्यांच्याविषयी प्रेम नाही. कारण त्यांनी सदैव आम्हाला ज्ञानापासून अलिप्त ठेवलं. याउलट आमच्या मनात संतांविषयी प्रेम आणि आदराची भावना आहे. संतांनी आम्हाला भक्ती मार्ग शिकवला. वारकरी संतांच्या जीवनात कुठेही भोंदूपणा नाही. तुकाराम महाराजांचे विचार आजच नव्हे, तर भविष्यातही तारक ठरणारे आहेत. संगीत ‘संत तुकाराम’ हे नाटक खरे संत कोण आणि भोंदू कोण यातील फरक ओळखायला शिकवणारं असल्याचं प्रतिपादनही दादामहाराजांनी केलं.

संगीत ‘संत तुकाराम’च्या निमित्ताने करण्यात सत्कार हे आपल्या परंपरेचं भाग्य असल्याचं सांगत सद्गु्रू हभप दादामहाराज मोरे माऊली म्हणाले की, तुकाराम महाराजांचं जीवन हा एक मोठा स्पॅन आहे. आजवर अनेकांनी तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्त्व रंगवलेलं आहे, पण संगीत ‘संत तुकाराम’ या नाटकाचे लेखक बाबाजीराव राणे यांचं मी कौतुक करतो. त्यांनी १९१३ मध्ये या नाटकाची संहिता लिहिली. धार्मिकतेवर प्रहार करणारं हे नाटक जनतेसमोर आणलं. बालगंधर्वांना या नाटकाविषयी ओढ निर्माण व्हावी यापेक्षा या नाटकाचं दुसरं भाग्य ते कोणतं? आजवर पत्रकार म्हणून परिचयाचे असलेले ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव यांचा अभिनय या नाटकाच्या निमित्ताने पाहता आल्याने एक वेगळाच आनंद मिळाल्याचंही दादामहाराज म्हणाले.

बाबजीराव राणे यांनी सर्वप्रथम राजापूर नाटक मंडळीच्या माध्यमातून संगीत ‘संत तुकाराम’ हे नाटक रंगभूमीवर आणलं होतं. त्यावेळी या नाटकाचे १०८ यशस्वी प्रयोग करण्यात आले होते. आता ज्ञानेश महाराव यांच्या प्रयत्नांतून मनोहर नरे संस्थापित ओमनाट्यगंधा या संस्थेअंतर्गत संगीत ‘संत तुकाराम’ हे नाटक पुन्हा नव्या संचात सादर होत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन संतोष पवार यांनी केलं आहे. ज्ञानेश महाराव यांच्यासह देव कांगणे, लीना पिंपळकर, श्रद्धा मोहिते, रोहन पेडणेकर, मयूरेश कोटकर, शेखर, अंकिता आणि तुकाराम महाराजांच्या भूमिकेत विक्रांत आजगावकर यांनी या नाटकात अभिनय केला आहे. अमर देऊलकर, श्रीरंग परब आणि सुनील शिंगाडे यांनी वादनाची साथ केली आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *