Breaking News

दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याची अन्न व पुरवठा मंत्री बापट यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात दिवसेंदिवस दूध भेसळीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे ओरिसा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करावी अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी सूचनेच्या वेळी केली. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट  म्हणाले की, याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे सदर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा करण्याबाबत प्रस्ताव पाठवून मत मागविण्यात आले आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर त्याबाबतची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

तसेच कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी कायद्यात बदल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत सकाळच्या विशेष सत्रात राज्यातील दूध भेसळीच्या संदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावेळी भाजपचे अमित साटम, शिवसेनेनेचे चंद्रदीप नरके, सुभाष साबणे, राहुल कुल यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे सांगत त्याबाबत किती गुन्ह्यांची नोंद झाली अशी विचारणा केली. तसेच पश्चिम बंगाल, ओरिसा आणि उत्तर प्रदेश या राज्यात दूध भेसळीच्या गुन्ह्यात दोषी ठरल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जन्मठेपेची तरतूद करण्याबाबत शासनस्तरावर काही कार्यवाही सुरू आहे का, अशी विचारणाही केली.  त्यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट म्हणाले की, कठोर कारवाईबाबत तरतूद करण्याची सुचना केंद्र सरकारकडून प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. भेसळखोरांना जन्मठेपेची शिक्षा करता येऊ शकते का याची चाचपणी करण्याच्या सुचनाही करण्यात येतील असेही ते म्हणाले.

तर भेसळ रोखण्यासाठी पेट्रोल आणि रॉकेलच्या टँकरवर जशी जीपीएस यंत्रणा असते त्याचप्रमाणे दूधभेसळ रोखण्यासाठी दुधाच्या टँकरवरही जीपीएस यंत्रणा लावावी, अशी सुचना याच चर्चेच्या एका उपप्रश्नादरम्यान शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. त्याला उत्तर देताना बापट यांनी या सुचनेवर विचार केला.

 

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *