Breaking News

कोविड काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

मंत्रालयात महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटने (सेंट्रल मार्ड)च्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांची भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर ढोबळे- पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रणव जाधव, जनरल सेक्रेटरी डॉ.धनराज गीते, ॲडीशनल जनरल सेक्रेटरी डॉ. अक्षय चावरे, राज्य समन्वयक डॉ. निखील कांबळे, जॉईट सेक्रेटरी डॉ. चेतनकुमार आद्रट उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले, गेल्या दिड वर्षापासून निवासी डॉक्टर रात्र दिवस कोविड -19 परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे या डॉक्टरांना शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून याबाबत तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. वैद्यकीय संचालकांमार्फत प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

आपल्या घरापासून दूर राहत अनेक विद्यार्थी वसतीगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतीगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतीगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक याबाबत माहिती घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सेंट्रल मार्ड मार्फत शैक्षणिक शुल्क माफी, कोविड काळात  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे, वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, निवासी डॉक्टरांची सुरक्षितता या मागण्यांचे निवेदन यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांना देण्यात आले.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *