Breaking News

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा आरपारच्या लढाईत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी- बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रीय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

या कृषी कायद्याविषयी शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. शेतकऱ्यांच्या या लढाईत काँग्रेस पक्ष नेहमीच भक्कमपणे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे काळे कायदे रद्द करावेत हीच काँग्रेसची भूमिका राहिली आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलने ही केली आहेत. राहुल गांधी यांनी पंजाब आणि हरियाणामध्ये या काळ्या कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅली ही काढल्या. महाराष्ट्रातही विविध आंदोलने करुन या कायद्यांना विरोध दर्शवलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

८ डिसेंबरच्या भारत बंदमध्येही राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहतील. यावेळी धरणे आंदोलन, निषेध मोर्चे काढून या बंदमध्ये सहभागी होतील असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी ग्वाही दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *