राजकिय श्रेयनामावलीत आपलेही नाव जोडले जावे या उद्देशाने नवी मुंबई मेट्रोचे काम पुर्ण झालेले असतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने अखेर नवी मुंबईची मेट्रो उद्घाटनाविनाच धावणार असल्याचे खात्रीलायक माहिती नगरविकास विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. तर सिडको प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मेट्रो मार्गक्रमनाचा अधिकृत उद्घाटनाचा कार्यक्रम न करताच मेट्रो सेवेला सुरुवात करण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
वास्तविक पाहता मागील महिन्यात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या कालावधीत १७, १८, आणि १९ ऑक्टोंबर या तीन तारखांपैकी एका तारखेला नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागण्यात आली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोंबर रोजीची तारीखही निश्चित करण्यात आली होती. परंतु त्याच दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलने सुरु झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत यायचे टाळल्याची माहितीही सदरच्या अधिकाऱ्याने दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोचे उद्घघाटन होणार असल्याने या उद्घाटन सोहळ्याला सुरुवातीला नवी मुंबईत ज्या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्या मैदानावरच मेट्रो उद् घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होता. परंतु नंतर त्या मैदानाऐवजी उरण येथील मोकळ्या मैदानावर उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी नगरविकास विभागाचे उच्चाधिकारी, नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबई मेट्रोसाठी वेळ मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ डिसेंबरपासून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन न करताच सिडको प्रशासनाने मेट्रो सेवेला सुरुवात करावी असे आदेश दिले. त्यामुळेच अखेर सिडकोचे मुख्याधिकारी अनिल डिग्गीकर यांनी नवी मुंबई मेट्रो सेवा २५ डिसेंबर रोजी पासून सुरु करण्यात येत असल्याचे आज जाहिर केले.