Breaking News

अजित पवार यांच्या आडून भाजपाने केला मुख्यमंत्री शिंदेचा ‘गेम’? शिंदे गटातील संभावित मंत्र्यांचा शपथविधी पुन्हा लटकणार

राज्यात एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेत बंड घडवून आणत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना वेगळे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाने स्थापन केले. या सरकार स्थापनेलाही एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना अद्यापही जनतेतून सहानभूती आणि पाठिंबा मिळविता आला नाही. त्यातच ज्यांना अद्याप मंत्रिपदे मिळाली नाहीत अशा आमदारांकडून राजकिय समज दाखविण्याऐवजी उतावीळ पणा दाखविण्यात येत असल्याने अखेर दिल्लीतील भाजपा धुरिणांकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या रूपाने फुट पाडली असली तरी आगामी निवडणूकीच्या काळात जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपाकडून या प्रयत्नाचा भाग असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु असून अजित पवारांच्या आडून शिंदे गटाचा भाजपाने गेम केल्याचे सांगण्यात येत आहेत.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. मात्र या एक वर्षाच्या कालावधीत मुळ शिवसेनेचा असलेला मतदार अद्याप बदलेला नाही. तसेच ठाकरे गटाकडून ज्या काही जाहिर सभा घेण्यात येत आहेत. त्या सभांनाही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सभांना जनतेला येण्या-जाण्याच्या सुविधांसह आणले तरी जनता सभा संपेपर्यंत बसून रहायला तयार नाही. त्यातच शिंदे गटाच्या आमदारांकडून वाचाळ पध्दतीची वक्तव्ये सातत्याने करण्यात येत आहेत. त्यामुळे आहे त्या परिस्थितीचा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांना सामोरे गेले तरी जनतेचे मतदान शिंदे-फडणवीस सरकारच्या पारड्यात पडणार नसल्याचे खात्री भाजपाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेलेली राजकिय इभ्रत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीत असंतुष्ट असलेल्या अजित पवार यांना निवडणूकीसाठी शेवटचे वर्ष राहिले असताना जाणिवपूर्वक सरकारमध्ये सहभागी व्हायला लावल्याचेही भाजपाच्यावतीने सांगण्यात येत आहे.
त्यातच शिंदे गटाच्या कोट्यातून ज्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्या मंत्र्यांकडून अद्यापही खात्याचा कारभार समजलेला नसल्याने या

मंत्र्यांकडून फक्त बदल्या, पदोन्नती, टेंडर यामध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शनाच्या कामात व्यस्त असल्याची चर्चाही भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांकडे सातत्याने पोहोचत आहे. बरं ही चर्चा फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर या गोष्टीची चर्चा सर्वसामान्य जनतेतही बातम्यांच्या स्वरूपात पोहोचत असल्याने शिंदे गटाला सोबत घेणे आणि त्यांच्यासोबत जाणे परवणारे नसल्याची जाणीव भाजपाला झाल्याचेही बोलले जात आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे विधानसभेत अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. यापार्श्वभूमीवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकाला सामोरे जायचे असेल तर जनसामान्यांमध्ये स्वतःची प्रतिमा असलेला नेता हवा या अनुषंगाने शोध घेण्यात येत होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव आघाडीवर असून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत येणाऱ्या आमदारांवर असलेले गुन्हे माफ करून त्यांच्या मदतीने भाजपाची लोकसभा आणि विधानसभेतील संख्या वाढविण्याचा प्रयत्न असल्याचेही भाजपामधील एका वजनदार नेत्याने सांगितले.

याशिवाय दर अधिवेशनाच्या आधी आणि नंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी असा सवाल शिंदे गटातील आमदारांकडून सातत्याने उपस्थित करण्यात येत होता. मात्र त्यांच्या गटातील आमदारांना मंत्रिपद देऊन सरकारची पत कमी करण्यापेक्षा त्यांना मंत्रिपद देण्याऐवजी अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रिपद देणे केव्हाही चांगले असे मत वरिष्ठानेचे झाले असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीतून सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्यासह सोबत आले त्यांनाच मंत्री पदाची शपथ दिली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारातही अजित पवार यांच्यासोबत आलेल्या खासदारांनाच संधी मिळणार असल्याने तेथेही शिंदे गटातील खासदारांचा पत्ता कापला जाणार असल्याने अजित पवार यांच्या आडून शिंदे गटाचा गेम करण्यात आल्याचेही भाजपामधील अन्य एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *