माझी या मराठ्याच्या मुलाची राज्य आणि केंद्र सरकारला एकच शेवटची विनंती असून तुम्हाला दिलेले एक महिन्याची मुदत संपत आली आहे. फक्त १० दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जी काही समिती नेमली आहे तिचे काम थांबवा आणि सर्व मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण जाहिर करा अन्यथा २२ तारखेला काय होत ते बघा असा खणखणीत इशारा मराठा समाजाच्या आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज लाखोंच्या उपस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारला दिला.
जाहिर केल्याप्रमाणे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे येथील १०० एकर जागेवर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी वरील इशारा केंद्र आणि राज्य सरकारला दिला. या जाहिर सभेला जवळपास ४० लाख मराठा समाजाचे नागरिक आल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाची प्रमुख मागणी ही मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे आरक्षण द्यावे ही मागणी आहे. त्यासाठी वेगळा वर्ग करावा लागला आणि त्यातून मराठा समाजाला आरक्षण देणार असाल तरी चालेल असे सांगत पण मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणीही केली.
त्यानंतर पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मराठा समाजाच्या मुलीवर ज्या नराधमाने बलात्कार केला त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत जे विद्यार्थी पीएचडी, पदवीत्तुर शिक्षण घेत आहेत त्यांना शिष्यवृत्ती द्या अशी मागणीही यावेळी केली.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, आम्हाला कोणाच्या हिश्शाचे आरक्षण नको पाहिजे तर ते स्वतंत्र आरक्षण या समाजाला मिळाले पाहिजे. तसेच गरीब, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला त्याच्या हक्काचे आरक्षण पाहिजे आहे. जेणे करून मराठा समाजातील पुढच्या पिढ्या या जगू शकतील असेही म्हणाले.
तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षण लढ्यातील शहिदांच्या घरच्यांना आर्थिक नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावी आणि त्यांच्या घरातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही केली.
सभेच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुमच्यात आणि आमच्यात बोलणी झाल्याप्रमाणे राज्य सरकारला दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे या मुदतीत आरक्षण देत असल्याचे जाहिर करा अशी मागणी करत अन्यथा २२ ऑक्टोंबर रोजी जे काय होईल ते बघाच असा इशाराही राज्य सरकारला देत पुढे म्हणाले, जर सरकारने या मुदतीत राज्य सरकारने आरक्षण जाहिर केले नाही तर २२ तारखेला आपण पुढील आंदोलनाची दिशा पत्रकार परिषदेत जाहिर करणार असल्याचा इशाराही दिला.
हा मनोज जरांगे पाटील तुम्हाला शब्द देतो की, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही भलेही माझी अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशाराही यावेळी राज्य सरकारला दिला.
या लाखो मराठा समाजाने भाजपाला राज्यात १०५ जागांवर निवडूण दिलंय हे विसरू नका असा इशारा देत मनोज जरांगे पाटील म्हणाले, केंद्रातील मंत्रिमंडळ आणि राज्यातील मंत्रिमंडळाने एकत्र येऊन सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी केली.