महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील संपादक शरद तांबे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. शरद तांबे यांचे महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी नुकतेच दिले आहे. पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ हा नेहमी लढत आला आहे व पुढे लढत राहणार आहे.
या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शाखा असून आपल्या लेखणीतून समाज कार्य करण्याबरोबरच समाजसेवा व्हावी व पत्रकारांवर अन्याय झाला तर संघटितपणे त्याचा मुकाबला करता यावा म्हणून संघटना सातत्याने काम करत आहे. आपण यापुढे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याची कार्यकारणी व पदाधिकारी यांची नियुक्ती करून तसा राष्ट्रीय कार्यालयाला आढावा सादर करावा .असे या नियुक्तीपत्रकात म्हटले असून श्री शरद तांबे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवर व पत्रकारांकडून अभिनंदन होत आहे.