Breaking News

मुंबई : खिचडी घोटाळ्यात ७ ठिकाणी ईडीची छापेमारी खिचडी वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता.

मुंबई, 18 ऑक्टोबर : मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटप घोटाळा प्रकरणी आज, बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शहरात ७ ठिकाणी छापेमारी केली. एकूण १३२ कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचा मुलगा, मुलगी, आणि अमोल कीर्तिकर यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता.

मुंबईतील महापालिकेच्या गरीब कामगारांना कोविड काळात खिचडी वाटप करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५० कंत्राटदार नेमून १६० कोटी रुपयांच्या खिचडीचे वाटप केल्याचे दाखवले आहे. पाच कोटी पॅकेट्स कामगारांना वाटल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, या खिचडी वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील तपास करत आहे. खिचडी वाटपाचे कंत्राट ५० कंत्राटदारांना महापालिकेतर्फे देण्यात आले होते. यापैकी १२ पेक्षा अधिक कंत्राटदार बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खिचडी वाटपामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचाही समावेश असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

एकूण ५० कंत्राटदारांना १३२ कोटी ८९ लाख रुपये वितरित केल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. यापैकी राजीव साळुंखे या केईएम रुग्णालयासमोर रिफ्रेशमेंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये दहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सह्याद्री रिफ्रेशमेंट या नावाने वैश्य सहकारी बँकेत हे खाते असून या खात्यामध्ये खिचडी वाटपाचे पैसे वर्ग करण्यात आले असे सोमैया यांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे सुरज चव्हाण यांच्यासह गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांची कोविड खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. याच प्रकरणात ६ ऑक्टोबर रोजी खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांनी ईडीने सुमारे ५ तास चौकशी केली होती.

Check Also

ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *