Breaking News

दहा वर्षांत केवळ १० भोंदूबाबांना शिक्षा; अंधश्रद्धा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात १२०० गुन्हे दाखल जादूटोणाविरोधी आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या जागृतीसाठी रविवारपासून राज्यभरात जादूटोणाविरोधी प्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.‘जादूटोणाविरोधी कायदा हिंदूविरोधी असल्याचा प्रचार खोटा असल्याचे कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेनंतर अस्तित्वात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दहा वर्षांत राज्यात फक्त दहा भोंदूबाबांना शिक्षा झाली आहे. तसेच; राज्यात बाराशे आणि दाभोलकर यांची हत्या झालेल्या पुण्यात ५८ गुन्हे दाखल झाले आहेत.

कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने नियम न आखल्याने भोंदूबाबांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला रविवारी दहा वर्षे पूर्ण . दाभोलकर यांच्या हयातीत अस्तित्वात न आलेला कायदा त्यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या रेट्यातून तत्कालीन राज्य सरकारने २६ ऑगस्ट २०१३ रोजी ‘जादूटोणाविरोधी विधेयक’ म्हणून मंजूर केला. दहा वर्षांत विविध पक्षांची सरकारे आली; पण कोणत्याही सरकारने नियम करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवलेली नाही.

महाराष्ट्राचा आदर्श घेऊन कर्नाटक सरकारनेही हा कायदा केला. तिथे चळवळीतून कायदा अस्तित्वात आला नसल्याने प्रभावी वापर झालेला नाही. नरबळी, अघोरी विद्या, नग्नपूजा, भूत उतरवणे, पैशांचा पाऊस, गुप्तधन, अंगाला चटका देणे, चमत्काराचा दावा करून महिलांचे लैंगिक शोषण करणे, भानामती, सर्पदंश, करणी, अशा प्रकारची बुवाबाजी करून शोषण आणि आर्थिक फसवणूक करणार्‍यांविरोधात या कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. नरबळीची तयारी सुरू असताना, दहा प्रकार नागरिकांनी रोखले. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कडक नियम आखण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र ‘अंनिस’चे पदाधिकारी डॉ. हमीद दाभोलकर आणि मिलिंद देशमुख यांनी सांगितले. ‘अंधश्रद्धेविरोधातील पन्नास टक्के तक्रारी सामान्य लोकांनी दाखल केल्या असल्याने ही चळवळ लोकांनी हाती घेतल्याचे स्पष्ट आहे.

मात्र, तरीही या कायद्याबाबत नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये पुरेशी जनजागृती झालेली नाही. दक्षता अधिकारी ही महत्त्वाची तरतूद असताना पोलिसांना कसलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. महाराष्ट्रात मोठ्या सामाजिक घुसळणीनंतर हा कायदा अस्तित्वात आल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असे दाभोलकर यांनी सांगितले.

जादूटोणाविरोधी आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या जागृतीसाठी रविवारपासून राज्यभरात जादूटोणाविरोधी प्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.‘जादूटोणाविरोधी कायदा हिंदूविरोधी असल्याचा प्रचार खोटा असल्याचे कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

अंधश्रद्धा पसरवून शोषण आणि फसवणूक करणार्‍या सर्व धर्मीय भोंदूबाबांवर दहा वर्षांत कारवाई झाली आहे. या कायद्यामुळे सत्यनारायण पूजा आणि आषाढी वारीवर बंदी येईल, इतका टोकाचा अपप्रचार करण्यात आला. हा कायदा अंधश्रद्धेविरोधात असल्याचे लोकांना पटल्याने तक्रार घेऊन येणार्‍यांचे प्रमाण दहा पटीने वाढले आहे,’ असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *