Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, हे शासन कलाकारांना संधी देणारे अन् त्यांचा सन्मान करणारे राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

एखाद्या कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे असते. हे शासन कलाकारांना संधी देणारे आणि त्यांचा सन्मान करणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण’ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी संदीप माळवी, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत कांबळे, सचिव निलेश पानमंद, खजिनदार वैभव विरवटकर, मनोज सिंग व सहकारी पदाधिकारी, पारितोषिक विजेते छायाचित्रकार तसेच नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित सर्व छायाचित्रकार, पत्रकारांना जागतिक छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. छायाचित्रण ही कला नक्कीच सोपी नाही. यासाठी वेगळी दृष्टी लागते, प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या मेहनतीला न्याय देण्याचे काम हे शासन नक्कीच करेल.

मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेते ठरलेल्या अन्य राज्यातील छायाचित्रकारांचे आणि अशा प्रकारची स्पर्धा दरवर्षी आयोजित करणाऱ्या ठाणे दैनिक पत्रकार संघाचेही विशेष अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य हे सर्वांना सामावून घेणारे राज्य असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, पारंपरिक गोष्टींना आता आधुनिकतेची जोड देणे, ही काळाची गरज आहे. हे शासन पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे करीत आहे. विकासाला प्राधान्य देत आहे. मात्र हे करीत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीही कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. ठाणे शहराचाही सर्वांगीण कायापालट होत आहे. लवकरच येत्या काळात आपणा सर्वांना स्वच्छ, सुंदर, विकसित ठाणे शहर आणि जिल्हा पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये दीपक जोशी व समीर मार्कंडेय यांचा तसेच राज्य व विभागीय अधिस्वीकृती समितीवर निवड झालेल्या ठाणेकर असलेले पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत आणि वैभव विरवटकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *