राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व पक्षिय नेत्यांचे सध्या विविध मतदारसंघात दौरे सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी आमदारांना शासकिय आणि पोलिसांच्या वाहनातून रसद पुरविली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या आरोपाची दखल घेत प्रत्येक वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्याचे आदेश दिले की असा समज निर्माण होत असून आज उद्धव ठाकरे यांच्या बॅगा अमरावतीत आल्यानंतर तपासण्यात आल्या. त्यावरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांकडून टीका-टीपण्णी करण्यात येत आहे.
आज अमरावतीत प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे पोहचल्यानंतर त्यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर जाहिर सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज जशी तुम्ही माझी बॅग तपासली, तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या का असा सवाल करत जर तुम्ही (निवडणूक आयोगाचे अधिकारी) त्यांच्या बॅगा तपासणार नसाल तर महाविकास आघाडीचे कार्यकर्त्ये त्या बॅगा तपासतील असा इशाराही यावेळी दिला.
यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोक सांगत आहेत की, मला जास्त भाषणे करण्याची गरज नाही. कारण विजय तुम्हालाच दिला आहे. फक्त २० तारखेला कोणालाही डोळ्यावर पट्टी बांधू देऊ नका आता न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी देखील काढली आहे. त्यामुळे तुमच्याही डोळ्यावर पट्टी असण्याती गरज नाही. तुम्ही डोळसपणे मतदान करा असे सांगत मी कोणालाही दोष देत नाही मात्र यंत्रणेला दोष देतो. मी हेलिकॉप्टरने उतरताच माझ्या स्वागताला ८ ते १० जण उभे होतो. मी विचारले काय करायचंय, तेव्हा ते म्हणाले बॅग तपासची आहे. मी म्हटलं तपासा तसेच ते जे तुमचे खिसे तपासतात तसं तुम्ही देखील तपासा आता जे तुमची तपासणी करत आहेत त्यांची ओळखपत्र देखील तपासा हा आपला अधिकार आहे. तुम्हाला जर तपासणी अधिकाऱ्याने अडविले तर अधिकाऱ्याच्या ओळखपत्रासह त्याचे खिसे देखील तपासा हा तुमचा अधिकार असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी यंत्रणेला सांगतो की, तुम्ही जशी माझी बॅग तपासली तशीच पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बॅगा तपासता का असा सवाल करत तपासायला हवी की नको दाढीवाल्या शिंदेची तपासायला हवी की नको, फडणवीसांची तपासायला हवी की नको, पंतप्रधान मोदी आले की रस्ते बंद होतात ते त्याच्या गाड्या सुसाट सुटतात. मात्र पंतप्रधान मोदी असो कि अमित शाह असोत की देवेंद्र फडणवीस की अजित पवार यांच्या बॅगा अधिकारी तपासणार नसतील तर त्यांच्या बॅगा महाविकास आघाडीचे कार्यकर्त्ये तपासतील असे सांगत मग मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी मध्ये यायचं नाही, आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तस प्रचाराला कोणीही येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार मतदारांना असल्याचेही यावेळी सांगितले.
बॅगा तपासताना उद्धव ठाकरे यांनी स्वतः रेकॉर्ड केलेला व्हिडीओ पहाः
डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात सगळ्यांना समान न्याय हे आम्ही मानतोच.पण यंत्रणांना हाताशी धरुन लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमत गाजविणाऱ्या दिल्लीश्वरांनी मात्र त्या संविधानाचा सगळ्याच पातळ्यांवर अवमान करायचा ठरवलं आहे.
आज उद्धवसाहेबांच्या सामानाची वणी येथे काही… pic.twitter.com/XyM53sKOsy— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 11, 2024
Marathi e-Batmya