राज्यातील विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीतील शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून निवडणूकीला लोकसभेप्रमाणेच महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीनेही लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले. पण २८८ उमेदवार दोन्ही आघाड्यांकडून जाहिरच केले नसल्याचे दिसून येत आहे.
त्यानुसार महायुती आणि महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात केली. या जागा वाटपाच्या चर्चेत भाजपाने अंतर्गतरित्या आधीच ठरवून टाकले की विधानसभेच्या १५०+ जागा लढविणार असल्याचे जाहिर केले. तर विविध सूत्रांच्या माध्यमातून शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अनुक्रमे ७० ते ८० आणि ४० ते ६० जागा मिळणार असल्याचे अनधिकृरित्या जाहिर केले. या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीकडून कधीच शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे महायुतीकडून अनेक मतदारसंघात महायुतीतील दोन दोन उमेदवार जाहिर करत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले.
महायुती कडून एकूण जागा
भाजपा+ मित्रपक्ष-१४८+४-१५२
शिवसेना शिंदे+मित्रपक्ष-७८+२-८०
अजित पवार यांची राष्ट्रवादी-५३ जागा
एकूण २८५
तर महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही जाहिर करण्यात आलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि प्रत्यक्ष जागा वाटप यांच्यात मोठ्या प्रमाणावर अंतर पडलेले दिसून येत आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला जाहिर करण्यात आला. मात्र नंतर तो फॉर्म्युला ९०-९०-९० असा जाहिर करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष काँग्रेसकडून १०४ जणांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना उबाठाकडून ९० जणांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ८७ जागांवर उमेदवार जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जाहिर केलेल्या फॉर्म्युल्यापेक्षा अधिकच्या जागांवर उमेदवार जाहिर केले. मात्र तरीही १० जागांवरील उमेदवारांबाबत घोळ झाल्याचे दिसून येत आहे. या १० मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्षांनी एकाच मतदारसंघातून दोन दोन उमेदवार जाहिर केले. त्यामुळे महाविकास आघाडीने २८१ जागांवरच उमेदवार जाहिर केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीला प्रत्यक्षात शिल्लक राहिलेल्या जागांवर उमेदवार मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. यात महायुतीला ३ जागांवर तर महाविकास आघाडीला ७ जागांसाठी उमेदवार मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.
Marathi e-Batmya