Breaking News

नाना पटोलेंचा आरोपः नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवालांच्या चेह-यावरील बुरखा आता फाटला असून त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि गलथानपणामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. दिवसेंदिवस रुपयाचे अवमुल्यन होत आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे. जनता निराश असून देशात सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे. अर्थव्यवस्थेला रूळावर आणून लोकांना दिलासा देण्यासाठी अर्थतज्ञ या क्षेत्रातले जाणकार विविध सल्ले देत आहेत. पण देशाच्या अर्थमंत्री रूपयांची घसरण होत नाही तर डॉलर मजबूत झाला आहे असे सांगून क्रूर थट्टा करत आहेत.

आता दिल्लीचे उच्चशिक्षीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निर्मला सितारामन यांच्या पुढे एक पाऊल टाकत रूपयांची घसरण रोखण्यासाठी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतींचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी केजरीवाल आता चलनी नोटा आणि अर्थव्यवस्थेला धार्मिक रंग देत आहेत. केजरीवाल यांना या संदर्भातील कायदे आणि नियम माहित असूनही अशी मागणी करून ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनी तर त्यापुढे जाऊन नोटांवर मोदींचा फोटे छापण्याची मागणी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत राज्यातील या नेत्यांची बुद्धी ही दिवाळखोरीत निघाली आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Check Also

न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना या अटी व शर्तीवर १ जून पर्यंत अंतरिम जामीन

सर्वोच्च न्यायालयाने १० मे (शुक्रवार) रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *