Breaking News

शिवसेनेशिवाय विजय शक्य नसल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या भाजपच्याच पदाधिकाऱ्यांसमोर मुख्यमंत्र्यांची कबुली

मुंबई : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत सत्तेतील सहकारी पक्ष शिवसेनेने चांगलीच कुरघोडी केली. तसेच आहे त्या जागा राखण्यातही यश आले नसल्याने आगामी निवडणूकीत शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला यश मिळणे शक्य नसल्याची चिंता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आगामी निवडणूकांच्यादृष्टीने भाजपच्या कोअर आणि पदाधिकाऱ्यांची दादर येथील वसंत स्मृती येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पालघरच्या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात लढवूनही भाजपने विजय मिळवला आहे .पण हा विजय मिळवण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आहे .त्यामुळे आगामी निवडणूका जिंकण्यासाठी शिवसेनेची सोबत ही जमेची बाजू असेल असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले.

या बैठकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की , कार्यकर्त्यांशी संवाद साधून पदाधिकारी पक्षाची स्तिथी वरिष्ठ नेत्यांच्या समोर मांडत असतात. आजच्या पदाधिकारी बैठकीतही या संदर्भातला आढावा घेण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरु करण्याचे निर्देश दिले. शिवसेनेला सोबत घेण्याबाबत चर्चा झाली का ? अशी विचारणा करताच दानवे पुढे म्हणाले शिवसेना आताही आमच्या सोबत सत्तेत आहे. एक पोट निवडणूक शिवसेनेने भाजप विरोधात लढवली पण आमच्या पक्ष श्रेष्ठीनी सेना सोबत असल्याचा उल्लेख वारंवार केला आहे. यापुढेही चर्चेचा मार्ग थांबला नसल्याचे स्पष्ट केले.

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विधान परिषदेच्या चार जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत ही चर्चा करण्यात आली. दरम्यान ,राज्यात शेतकऱ्यांच्या संपाचा सातवा दिवस असून पुढे स्थिती आणखी बिकट होत जाणार असल्याची चिंता ही काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला  योग्य दर मिळवून देण्यासाठी आणखी काही ठोस पावले उचलली  गेली पाहिजेत. तसेच वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे  जनतेत नाराही असल्याचा सूरही या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आळवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा इशारा,….तर संविधान व आरक्षणही संपवणार

काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *