Breaking News

उदयन राजे भावनिक होत म्हणाले, तुम्हाला राग का येत नाही?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारी वक्तव्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपासह राज्यपाल कोश्यारी यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत पाठराखण केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदी यांच्या वक्तव्यावरून वातावरण आणखीच तापले असून राज्यपालांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे १६ वे वंशज तथा भाजपा खासदार उदयन राजे यांनी आज पत्रकार परिषद घेत तुम्हाला राग का येत नाही? असा सवाल राज्यातील नेत्यांसह जनतेला केला. यावेळी उदयनराजे भावनिकही झाल्याचे पाह्यला मिळाले.

राज्यापालांच्या विधानानंतर आज राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांशी आम्ही चर्चा केली. सर्वांनी राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला. मात्र, एक विचार सतत मनात येतो. ज्या शिवरायांनी सर्वधर्म समभाव हा विचार दिला, आज त्यांचा सर्वपक्षीय नेते केवळ स्वार्थासाठी वापर करतात. प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे फोटो लावतात, त्यांना अभिवादन केले जाते. मात्र, जेव्हा लिखान असेल किंवा विधान आणि चित्रपटांच्या माध्यमातून शिवरायांचा अवमान केला जातो, तेव्हा तुम्हाला राग का येत नाही? मुळात या विषयावर आता जनतेने विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून शिवाजी महाराजांबाबत जे बोललं जात आहे. इतिहासाचे जे विकृतीकरण केले जात आहे. ते कुठतरी थांबवले गेले पाहिजे. नाही तर हाच मोडका तोडका इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल, ही जबाबदारी सर्वांची आहे, असेही ते म्हणाले.

देशाविरोधात केलेल्या एखाद्या कृत्याबाबत ज्याप्रकारे देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, त्याचप्रमाणे महापुरुषांची बदनामी, त्यांच्या विरोधात नको ती विधानं करणाऱ्यांविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच अशा लोकांविरोधात तुम्ही कारवाई करू शकत नसाल तर कोणालाही राजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. निवडणुका आल्या की राजांचे नाव घेता, मग जेव्हा त्यांचा अवमान केला जातो. तेव्हा तुम्हाला दुखं वाटत नाही का? यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

आज देशात केवळ जातीपातीचं राजकारण सुरू आहे. हे थांबवलं नाही, तर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग जर तुम्हाला जातीपातीचे राजकारण करायचे असेल, तर कशाला शिवरायांचे नाव घेता? कशाला ढोंग करता? कशाला बेगडी प्रेम दाखवता? कशाला रेल्वे स्थानकांना विमानतळाला महाराजांचे नाव देता? आणि कशाला शिवजयंती साजरी करता? असे प्रश्नही त्यांनी विचारले.

दरम्यान, यावेळी उदयनराजे भावूक झाल्याचेही बघायला मिळाले. आज शिवरायांचा होत असेलला अवमान बघण्यापेक्षा मी मेलो असतो तर परवडलं असते, अशी प्रतिक्रियाही दिली. तसेच येत्या ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन, आमचा आक्रोश, आमच्या वेदना आम्ही व्यक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *