महानगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन राज्यातील महानगरपालिकांमधील ‘प्रशासनराज’ मुळे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीचे काम करत असून जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. महानगरातील जनतेच्या समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसने राज्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रात आज आंदोलन केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरुद्ध नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढून महानगरपालिकेच्या गेटवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोग्य, पाणी, रस्ते, शैक्षणिक व सुरक्षा मुलभूत हक्कांसाठी तसेच महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

पनवेल महानगरपालिकेच्या कारभार विरुद्ध पनवेल तालुका व पनवेल शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, प्रदेश सचिव मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस प्रभारी राणी अग्रवाल, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर विविध नागरी समस्यांबाबत आंदोलन करून आयुक्त अनिलकुमार पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस जो जो थॉमस, प्रदेश सचिव धनराज राठोड, वसई विरार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ओनिल अल्मेडा आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *