Breaking News

पुण्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून बचावकार्य सुरु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक महसूल, पोलीस व इतर प्रशासनासह एनडीआरएफ, एसडीआरफच्या टीम तातडीने कार्यरत करण्यात आल्या आहेत. बचाव कार्य व मदत कार्य वेगाने सुरू असून नागरिकांनी मदत कार्यास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पुण्यात पावसाचा जोर वाढल्यापासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून, पाणी शिरलेल्या भागात तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना त्यांनी दिल्या.
पुणे जिल्ह्यातील नाझरे धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला. यामुळे कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. तसेच पुणे शहरातील कात्रज, व हवेली तालुक्यातील तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे रहिवासी भागात पाणी शिरले. यानंतर जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना पाचारण करण्यात आले. तसेच, महसूल यंत्रणा, महापालिकेची अग्नीशमन दल, पोलीस यंत्रणा आदींनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवित आले आहे. या अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील अनेक भागात पाणी शिरले आहेत, या भागातील जवळपास २८ हजार ८०० जणांना आणि ६०२ जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या सर्वांसाठी ४४ ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तर पुणे शहर ३५०० नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या अतिवृष्टीनंतर सतर्कतेसाठी पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली असून आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आले आहेत. नागरीकांच्या मदतीसाठी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.
अतिवृष्टीमुळे पुणे शहरातील सहकारनगरमध्ये रहिवासी इमारतीची भिंत कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बारामती मध्ये दोन आणि हवेली तालुक्यात तीन जण वाहून गेले आहेत. या दुर्घटनेतील मृतांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केली.
आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी पुणे जिल्हा ०२०-२६१२३३७१ आणि पुणे शहर ०२०-२४५४५४५४, पुणे महानगरपालिका ०२०-२५५०१२६९, ०२०-२५५०६८००/०१/०२/०३, बारामती नगरपरिषद ०२११२२२२३०७ आणि ०२११२२२२४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले.
बारामतीतील १५ हजार नागरीकांना हलविले-मुख्यमंत्री
पुणे शहर व जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. तसेच बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नदीचे पाणी आले. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीकोनातून बारामती तालुक्यातील १५ हजार नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *