मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे भाजपाचे आणि त्याततही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते. त्यांची हत्या का झाली आणि या हत्येत कोण कोण सहभागी होतं याबद्दलची माहिती चांगल्यापैकी बाहेर आलेली आहे. या प्रकरणातील सध्या तरी एक आरोपी वगळता जवळपास सर्वच आरोपी अटक झालेले आहेत. त्यावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. मात्र या सगळ्यात या प्रकरणाच्या मध्यभागी असलेल्या अजित पवार पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा मात्र दिवसेंदिवस होत असलेल्या भाजपाच्या राजकारणामुळे लांबणीवर पडत चालला आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड हा जरी जामीनावर किंवा निर्दोष म्हणून बाहेर आला तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही घेतला जाणार नाही असे स्पष्ट होत आहे.
संतोष देशमुख हे भाजपाचे कार्यकर्त्ये मात्र त्यांचीच हत्या झाल्यानंतरही केवळ मुंडे कुंटुबियांचे राजकारण संरक्षित करण्यासाठी सध्या भाजपा आणि अजित पवार यांच्या गटाकडून प्रयत्न होत असताना दिसून येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबधाबाबत आणि त्यांच्या गुंडगिरीबाबत विधानसभेत वाच्यता केली. त्यावेळी अजित पवार यांनी विधानसभेतच सुरेश धस यांना कसा इशारा केला होता याची माहिती हिवाळी अधिवेशासाठी उपस्थित राहिलेल्या पत्रकारांनी पाहिले होते. त्यानंतर सुरेश धस यांच्या भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकालाही पाठीशी घालणार नाही सर्व आरोपींवर कारवाई करणार असल्याचे जाहिर केले.
मात्र कारवाई सुरु होण्याआधीच वाल्मिक कराड हे सर्वात आधी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले. नेमक्या त्याच कालावधीत वाल्मिक कराड यांचे विश्वासू सहकारी असलेले आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असणाऱ्यांना पोलिस प्रशासनाने अटक केली. याच कालावधीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची या प्रकरणात एंट्री झाली. त्यांनीही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या आर्थिक हिंतसंबधाची माहिती पुढे आणली. तसेच यासंदर्भातील काही पुरावे आणत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या अजित पवार यांची भेट घेत सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते पुरावे दाखवले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकमेकांकडे बोट करत धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही घेतला नाही.
थोडंस विषयांतर करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईल्या बार-परमिट रूम चालकांकडून वसुली करण्याचे आदेश निलंबित सचिन वाझे यांना दिल्यावरून त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आकाश पाताळ एक केले होते. तसेच पोलिसांनी विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी फोडलेला अहवाल प्रकरणी जबाब घेण्यासाठी फडणवीस यांच्या मुंबईतील शासकिय निवासस्थानी पोहोचले तर तेथेही फडणवीस यांनी या प्रकरणाला कलाटणी दिली. या सगळ्या राजकिय घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांनी अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतलाच. त्यानंतर या प्रकरणात ईडी आणि सीबीआय या संस्थांचा प्रवेश झाला. मात्र आज स्थिती काय तर अनिल देशमुख दोन अडीच वर्षे तुरुंगात राहून बाहेर आले. तर त्यांच्या विरोधातील केस कोणत्या बंद डब्यात गेली. हे आता कोणालाच आठवत नाही.
पण विद्यमान परिस्थितीत भाजपा कार्यकर्त्याच्याच खुनात संशयित आरोपीच्या पिंजऱ्यात येऊनही भाजपाचे माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मात्र भाजपाचे काही धाडस होत नाही.
सुरेश धस यांनी अनेक जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या मुलगा आणि मुलगीला आणि भावाला सोबत घेत महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात जाहिर सभा घेतल्या. त्या जाहिर सभांमधून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासंबधाने अनेक गोष्टीचे प्रकरण उघडकीस आणत वारेमाप आरोप केले. मात्र अखेर धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन होताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आरोप करणारे सुरेश धस यांनी भेट घेत तब्येतीची विचारपूस तर केलीच पण तब्येतीची काळजीही घेण्याचा सल्ला दिला.
आज परिस्थिती अशी आहे की, अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले तर अजित पवारच म्हणतात ते धनंजय मुंडेलाच विचारा, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले तर ते भलतेच सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून राजकारण करणे चुकीचे असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे आरोप जरी करत असले तरी नेत्यांमधील संवाद टिकून राहिला पाहिजे. या दोन्ही वाक्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अर्थ एकच की चीत भी मेरी आणि पट भी मेरी, त्यामुळे जनतेनेने फक्त मुकपणे पाहायचे आणि कार्यकर्त्या कोणताही असो त्याची हत्या झाली तरी त्यावरील होणाऱ्या राजकीय खेळाचा फक्त आनंद घ्यायचा….
लेखन- गिरीराज सावंत
Marathi e-Batmya