अतुल लोंढे यांचा सवाल, युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? नगरविकास मंत्री शिंदे एकनाथ यांनीच मुंबई केली अनाथ, आपत्ती व्यवस्थापन विभाग, बीएमसी झोपले होते का ?

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळेच मुंबई जलमय झाली, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपा युती सरकारचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत अतुल लोंढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मागील १० वर्षापासून नगरविकास विभागाचे मंत्री आहेत, पण त्यांच्या विभागाने मुंबईची पुरती वाट लावली आहे, पावसाने नगरविकास विभागाच्या धोरणांचे धिंडवडे काढले. मुंबईच्या जनतेची कसलीही काळजी न करता केवळ भ्रष्टाचारात हे सरकार आकंठ बुडाले आहे. हवामान खात्याने इशारा दिला असताना त्याकडे दुर्लक्ष का केले? बीएमसीने आगाऊ सूचना का दिल्या नाहीत? पावसाच्या (SOP) असतात त्याची अंमलबजावणी का झाली नाही ? पाऊस ८ वाजता सुरु झाला आणि १२ वाजेपर्यंत प्रशासन झोपले होते का? असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, मेट्रो-३ चे काम अपूर्ण असतानाही त्याचे उद्घाटन करण्याची घाई का केली? आचार्य अत्रे स्टेशनमध्ये पाणी शिरले त्याची जबाबदारी कोणाची? मेट्रो स्टेशन कसे असावे त्यासाठी काही तांत्रिक बाबी आहेत. या स्टेशनला तीन प्रवेशद्वार तर तीन बाहेर पडण्याचे दरवाजे असायला हवेत पण या स्टेशनवर दोनच दरवाजे आहेत. या त्रुटींची तपासणी कोणत्या अधिकारी वा सल्लागाराने केली होती का? ४० मीमी पाऊस पडला तरी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरु शकते याची माहिती कोणालाच नव्हती का? बीएमसी अधिकाऱ्यांची ड्युटी मंत्र्यांच्या शिष्टाचारासाठी लावली आहे, मुंबईकरांच्या कामासाठी नाही अशी खोचक टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, फक्त आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, जूहू, वांद्रे भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले पण चर्चा फक्त मेट्रो स्टेशनची झाली. मुंबई जलमय झाली पण बीएमसीचे अधिकारी, ठेकेदार किंवा नगरविकास विभागाच्या कोणत्याच व्यक्तीवर कारवाई का झाली नाही. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मग कारवाई कोणावर केली याचे उत्तरही द्यावे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत, त्यांनाही उत्तर द्यावेच लागेल, असे निर्धारपूर्वक सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *