Breaking News

मुख्यमंत्री शिंदे कुटुंबियासोबत पंतप्रधान मोदी यांना भेटले, “पण आज आई असायला हवी होती…” इर्शाळगड ते धारावी सर्व विषयांवर चर्चा झाल्याची माहिती

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीसा पाठवित सात दिवसात लेखी म्हणणे मांडण्याची मुदत दिली. त्याचबरोबर राज्यातील भाजपाप्रणित सरकार कायम टीकविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट फोडत सरकारमध्ये सहभागी करून घेतला. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदल लवकरच होणार अशी चर्चा सुरु असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला वेळ देत बऱ्याच गप्पा मारल्याचे सांगत या भेटीमागचं काय कारण याची माहितीही दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज संपूर्ण कुटुंबासह मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. ही भेट खूप चांगल्या पद्धतीने झाली. आम्हाला पंतप्रधान मोदींनी बराच वेळ दिला. मी यासाठी त्यांचा आभारी आहे. या दरम्यान राज्यात काय काय घडतं आहे? या विषयीही आम्ही चर्चा केली. पाऊस आणि इर्शाळगड यासंबंधीही आम्ही चर्चा केली, असेही सांगितले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, धारावीचा प्रकल्प आहे त्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. हा प्रकल्प लवकर पूर्ण झाला तर लोकांचं जीवनमान उंचावेल, त्यामुळे तो लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच पुनर्विकासाचे जे प्रकल्प आहेत, त्यालाही चालना देण्याविषयी चर्चा झाली. माझ्या कुटुंबाची इच्छा होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटावं. त्यानुसार आम्ही त्यांची वेळ घेतली होती. माझ्या वडिलांशीही त्यांनी गप्पा मारल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या नातवालाही काही प्रश्न विचारले आणि त्याच्यासह गप्पाही मारल्याचं सांगितलं.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज आमच्या चार पिढ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्या याचा मला निश्चितच आनंद आहे. आज माझी आई हवी होती. असं मला आवर्जून वाटतं आहे. माझे वडील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंदी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं ही त्यांचीही इच्छा होती. आज आमच्या चार पिढ्या एकत्र होत्या.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातले पुनर्वसनाचे प्रकल्प आणि एमएमआरडीएचे प्रकल्प यांना चालना देण्याच्या संदर्भातही या भेटीत चर्चा झाली. आपल्या हक्काचं घर असावं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं त्या अनुषंगाने चांगली घरं उभी करणं हे सरकारचं काम असतं. त्यावर आम्ही चर्चा केली. केंद्र सरकारकडून विकास कामांना पूर्ण मदत केली जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी दिल्याचे सांगितले.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *