Breaking News

अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे मोठे नेते तर मग एकच खाते का? सगळ्या आमदारांमध्ये फडणवीसच नशीबवान

विधानसभेच्या दोन दिवसीय विधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर सत्ताधारी बाकाकडून अभिनंदनपर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावरील चर्चे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही वकील आहात. त्यामुळे आज तुम्ही सगळं कसे योग्य आहे ते सांगत आहात. मग एकनाथ शिंदे हे जर खरचं मोठे नेते आहेत तर तुमच्या सरकारमध्ये ते ही मंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे एकच खाते कसे होते असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री म्हणून असलेल्या अधिकारात त्यांच्याकडे आणखी लोकांशी संबधित खाते सोपायचे होते ना असा खोचक टोला फडणवीस यांना लगावला.

अनेक वर्षे मी देवेंद्रजींना या सभागृहात भाषण करताना पाहिलं आहे. परंतु देवेंद्रजी, नेहमीचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तुमचा जो जोश असायचा, तो मुख्यमंत्री असताना देखील पाहिला आणि विरोधी पक्षनेते असताना देखील पाहिला. तेव्हा सगळेजण शांत बसून तुमचं भाषण ऐकायचे. आज एक वकील या नात्याने तुम्ही हे सर्व कसं योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच एकनाथ शिंदे यांची कारकीर्द कशी दैदीप्यमान आहे, हे पण सांगण्याचा प्रयत्न देखील तुम्ही आपल्या भाषणात केल्याची आठवणही त्यांनी यावेळी मुद्दाम करून दिली.

यावेळेस विधिमंडळात जे कोणी आमदार निवडून आले आहेत, त्या आमदारांमध्ये सगळ्यात नशिबवान कोण असेल? तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. कारण निवडणुका होऊन अजून अडीच वर्षेच झाली आहेत, अजून अडीच वर्षे बाकी आहेत. पण अडीच वर्षात देवेंद्र मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले, विरोधी पक्षनेते पण झाले, त्यांनी अडीच वर्षात कुठलंच पद ठेवलं नाही. सगळी महत्त्वाची पदं भुषवली अशी मिश्किल टीपण्णी केली. पण अजित पवारांच्या या टीपण्णीवर फडणवीसांसह सगळ्या सभागृहात एकच हशा पिकला.

महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारली, कुणालाही वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल, पण हे झालं. स्वत: देवेंद्रजींनी भाषणातून सातत्याने एक शिवसैनिक, एक शिवसैनिक असा एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला. असा उल्लेख सतत का करावा लागत आहे. ही वेळ का येते. याचंही आत्मचिंतन झालं पाहिजे असा टोला लगावत ३० जूनला गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ४ जुलैपर्यंत विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा आदेश राज्यपालांनी दिला होता. त्यानुसार, तुम्ही बहुमताच्या जोरावर हा ठराव जिंकला. आम्ही विरोधी मतदान करत आमची भूमिका व्यक्त केली. लोकशाहीत हे चालतं असेही ते म्हणाले

राज्यात फिरत असताना मी नेहमीच सांगत असतो, सत्ता येते-जाते, ताम्रपट घेऊन कुणीचं येत नाही. पण देवेंद्रजी तुमचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. पण मला हे कळत नव्हतं की, तुम्ही एकनाथ शिंदे यांचं इतकं कौतुक करत होतात, तर मग मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे यांना केवळ रस्तेविकास महामंडळ खातेच का दिलं? त्यांचं कर्तृत्व एवढंच मोठं होतं तर एक मुख्यमंत्री म्हणून एखादं जास्तीचं खातं तुम्ही त्यांच्याकडे का दिलं नाही? असा उपरोधिक सवालही विचारत जनतेशी संबंधित नसलेलं खातंच त्यांना का दिलं, याचंही आत्मचिंतन व्हायला पाहिजे असेही ते म्हणाले.

नेता मोठा असला, की खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील तुम्हाला माहीत आहे. ज्याचं वजन असतं, तो नेता भारदस्त असतो. मुनगंटीवार खरंय की नाही? तुमच्याकडे वनखातं, वित्त, नियोजन, महसूल, पीडब्लूयडी, कृषी, सहकार होतं. किती तरी महत्त्वाची खाती होती. जर आजचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण सांगताय, तेवेढे सर्वगुण संपन्न अशी त्यांची पात्रता होती. तर तुम्हे फक्त एक छोटसं रस्ते विकास महामंडळ, की त्यामध्ये जनतेशी संबंधच नव्हता. फक्त महामार्ग करायचा, समृद्धी महामार्ग करायचा, टनेल कराचे, कोस्टल रोड करायचे एवढंच होतं. जनतेशी संबंधीत असेललं कुठलं खातं, तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री म्हणून चला माझा अधिकार आहे मी आणखी एक खातं त्यांना देतो, का नाही दिलं? याचा पण कुठं तरी विचार झाला पाहिजे. महाराष्ट्रपण विचार करेल आणि तुम्ही पण त्या संदर्भातील विचार त्या ठिकाणी केला पाहिजे असेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

पण शिवसेनेत ज्या ज्या वेळी बंड झाले. त्यावेळी बंड करणारा नेता सोडला तर बाकिचे नंतर निवडूणही येत नाहीत. यापूर्वी छगन भुजबळ यांचे बंड झाले ते विधानसभेत निवडूण येत आहेत. मात्र त्यांच्या सोबत असलेले अनेक जण परत विधानसभेत दिसले नाहीत. त्यानंतर नारायण राणे यांच्यासोबतही काही जणांनी बंड पुकारले. त्यांच्या पश्चातही नारायण राणे आणि इतर एक-दोघे सोडले तर बाकिचे अनेक जण सभागृहात दिसत नसल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *