Breaking News

गुलाबराव पाटील म्हणाले; शिवसेना सोडली नाही, पण उठाव केलाय अजित पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर विधानसभेत अभिनंदन पर प्रस्तावावरील चर्चे दरम्यान शिवसेनेतील बंडखोर आमदार बंडखोरीबाबत काय भूमिका मांडतात याविषयी उत्सुकता लागून राहिली होती. यावेळी अजित पवार यांनी सांगितलेल्या वाक्याचा धागा पकडत बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी बाबतची भूमिका मांडत जोरदार भाषण करत म्हणाले, आम्ही शिवसेना सोडली नाही. त्यामुळे आमच्या निवडूण येण्याची चिंता करू नका असे प्रत्युत्तर देत आमच्या आधी ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी विरोधी पक्षात प्रवेश केला, म्हणून ते पराभूत झाले. मात्र आम्ही बंड नाही तर उठाव केला. त्यामुळे आम्ही शिवसेना सोडली नसल्याचे स्पष्ट केले.

आमचे हे बंड नसून आम्ही उठाव केला. तसेच हिंदुत्वाच्या विचारधारेवर परतण्यासाठी हे आम्ही हे पाऊल उचलले आहे. आमच्यावर टीका केली गेली. तुम्ही बंडखोर झाले असे म्हणण्यात आलं. आम्हाला जे मिळालंय ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाहीये. आम्ही उठाव केला आहे. हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत न घेण्यासाठी या विचारावर आम्ही पुन्हा आलो आहोत. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. गुलाबराव तुला टपरीवर पाठवेन, असे म्हणण्यात आले. धिरुभाई अंबानीदेखील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे हा इतिहास असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना जेव्हा जन्माला आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. टपरीवाला, चहा विकणारा, रिक्षावाला, टोपली विकणारा, पुंगानी वाजवणारा, ज्याला काही काम नव्हतं अशा नेतृत्वांना पुढे आणलं. बाळासाहेबांनी तुम्ही एक दिवस आमदार व्हाल असं आमचं प्रारब्ध लिहिलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना जे सोडून जातात ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असं म्हणण्यात आलं. पण आम्ही शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडून येण्याची चिंता करण्याची गरज नाही, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

तसेच, शिवसैनिकांच्या विश्वासावर मी इकडे आलो आहोत, असे म्हणत ५५ आमदारांपैकी ४० आमदार कसे फुटतात? आणि तरीही तुम्ही म्हणता तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा असे कसे म्हणू शकता असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालमत्ता किती आहे, माहित आहे का? मग वाचा बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पीएम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *