Breaking News

भास्कर जाधव यांचा आरोप; शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव शिवसेना वाचविण्यासाठी दोन पावले माघारी घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपाच्या विरोधात तुफान फटकेबाजी करत म्हणाले, शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे साहेब शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं माघार घ्या, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

एकनाथरावजी शिंदे साहेब हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असं लढवत आहेत. यामुळे रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल, याठिकाणी घायाळ होतील ते फक्त शिवसैनिक होतील. आणि संपेल ती फक्त शिवसेना संपेल असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यांचा २५ वर्षाचा इतिहास बघितला, तर ‘शिवसेना संपवणं’ हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्याबद्दल त्यांना काहीही प्रेम आलेलं नाही. याची अनेक उदाहरणं मी सांगू शकतो. तुम्ही मुख्यमंत्री झालात, याचा मी आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची? यासाठी प्रसंगी दोन पावलं माघारी या, तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही, तर हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, ही एवढीच भावना व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

पानिपतच्या लढाईत जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रात युद्ध सुरू आहे. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, तर कुणाच्या हातात भोंगा दिला. पण सत्ता उलटली नाही. या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत आणि रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे चुलत भाऊ समोरासमोर उभे राहणार आहेत. पानिपतच्या युद्धात एकमेकांच्या विरोधात दिल्लीच्या बादशहासाठी लढत आहेत. पण दिल्लीचा बादशहा मात्र सहिसलामत आहे. मरताय ते फक्त महाराष्ट्रातील मराठी लोक. बादशहा मात्र सुखरुप आहे असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सरकार स्थापन झाल्यापासून तुमची प्रत्येक चाल सरकार उलथवून लावण्यासाठी होती. राज्यात कोरोनासारखं संकट आलं. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. एक विचारधारा आहे. राज्य संकटात असताना सरकार कोणाचे आहे हे पाहिलं जात नाही; तर संकटात राज्य बाहेर कसे येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधक खांद्याला खांदे लावून लढत असतात. मात्र कोरोना संकटात तुमची प्रत्येक कृती ही विरोधातील होती, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सकाळी सरकार पडेल, पंधरा दिवसात पडेल, आज पडेल उद्या पडेल असं म्हटलं गेलं. तुम्ही कधी कोणाच्या हातात भोंगा दिला, कधी कोणाच्या हातामध्ये हनुमान चालिसा दिलात. कधी महाराष्ट्रात नुपूर शर्मा आणलीत. कधी महाराष्ट्रात हिजाब आणला. कधी कंगना राणौत आणलीत तर कधी सुशांतसिंह राजपूत महाराष्ट्रात आणला. या महाराष्ट्राची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. पण सत्ता कायम राहिली, असे म्हणत त्यांनी भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला.

तुमच्यासोबत आलेल्या प्रत्येकाच्या मागे ईडी लावण्यात आलेली आहे. जे संजय राठोड यांच्याविरोधात भाजपाने जीवाचे रान केले. त्यांना आता भाजपाच्या मदतीने मंत्रीपद देणार आहात का? ज्या प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीमुळे त्रस्त व्हायच्या वेळी त्यांनाही हे भाजपावाले मंत्रिपद देणार का? या दोघांसारखे असे अनेक आहेत त्यांच्या मागे भाजपाने ईडी लावली. भाजपाने ज्यांना ज्यांना ईडी मागे लावली ती सगळी मराठी माणसे आहेत असे सांगत भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांची नावेच त्यांनी यावेळी वाचून दाखवत भाजपा फक्त मराठी माणसांच्या विरोधातच ईडी लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तरीही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले.

भास्कर जाधव ज्या वेळी बंडखोर शिवसेना आमदारांची नावे घेत होते. त्यावेळी संजय राठोड आणि प्रताप सरनाईक यांनी जाधव यांच्या वक्तव्यावर हरकत घेतली. मात्र जाधव म्हणाले मी तुमचीच बाजू घेतली. मी तुमच्यावर आरोप केले नाहीत. त्यामुळे मला नोटीस देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *