Breaking News

उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित रामदास कदमांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ आली नसती

काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांच्या विरोधात दापोलीतील रिसॉर्टप्रकरणाची माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुरविल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर रामदास कदम हे सातत्याने मातोश्रीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. तसेच उध्दव ठाकरे यांना भेटून प्रत्यक्ष आपली बाजू मांडण्याऐवजी त्यांनी पत्र लिहून या प्रकरणात काहीही संबध नसल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आपण शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगत पण मुलाचे काही सांगू शकत नाही असे स्पष्ट केले. मात्र आज उध्दव ठाकरे यांना खुले पत्र लिहीत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली केल्याचा आरोप करत आपण शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहिर केले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळालं, असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणतीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही असा उल्लेखही त्यांनी पत्रात केला.

मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे. २०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत सरकार बनवत होतात त्यावेळीही मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्यावेळी माझं ऐकलं नाही. याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी पत्राद्वारे सांगत आपण राजीनामा देत असल्याचे जाहिर केले.

रामदास कदम यांच्या या पत्रामुळे मागील अनेक दशकांपासून पक्षासोबत असणारा आणखीन एक नेता पक्षापासून दूर गेल्याचं चित्र दिसत आहे. मात्र अनिल परब यांच्याविरोधात अनेक पुरावे भाजपाकडे पोहोचविल्याचा संशय त्यांच्यावर अखेर पर्यत राहिल्याने मातोश्रीकडून त्यांना दूर लोटण्यात आले होते. तसेच रामदास कदम आणि त्यांचे जवळचे सहकारी असलेल्या एका व्यक्तीबरोबर किरीट सोमय्या यांच्याशी बोलणे झाल्याची एक ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली होती.

रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांना लिहिलेले हेच ते पत्र:-

Check Also

न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना या अटी व शर्तीवर १ जून पर्यंत अंतरिम जामीन

सर्वोच्च न्यायालयाने १० मे (शुक्रवार) रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *