मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी आज चेंबूर येथील श्रमजीवी नगर, वत्सलाताई नाईक नगर आणि कुर्ला येथील क्रांती नगर, साबळे नगर परिसरातील महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार व बीएमसीवर तोफ डागताना म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनी नालेसफाईची कामं जोमात सुरू असल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक भागांत नालेसफाईची कामं सुरूच झालेली नाहीत तसेच अन्य ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजूनही तसाच पडून आहे. त्यामुळे यंदाही मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आणि महापालिकेच्या बेजबाबदार, भ्रष्ट कारभाराचा फटका पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांना बसणार आहे. सत्तेतील मंडळी भ्रष्टाचाराचा ‘मेवा’ खात बसली असून मुंबईकर माज्ञ यातना भोगत आहे हे अत्यंत संतापजनक असल्याचा आरोपही केला.
पुढे बोलताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आजच्या पाहणीत नालेसफाईच्या कामांमध्ये दिरंगाई आणि अनेक त्रुटी आढळून आल्या, त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. या त्रुटी तत्काळ दुरुस्त कराव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. ज्या भागांत नालेसफाई अद्याप झाली नाही, ती तत्काळ पूर्ण करावी तसेच अन्य मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत अशी मागणीही यावेळी केली.
सत्ताधाऱ्यांनी आणि महापालिकेनं आपल्या कंत्राटदार मित्रांची गैरसोय होऊ नये म्हणून जनतेला वेठीस धरू नये. शासनाने आणि महापालिकेने मुंबईकरांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.
कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर!
खासदार वर्षा गायकवाड यांनी कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलला भेट दिली. या हॉस्पिटलची अवस्था अत्यंत गंभीर आहे. डॉक्टर व मेडिकल स्टाफ ची संख्या अत्यंत कमी आहे. १०० पेक्षा जास्त कर्मचारी कमी आहेत. एक्स रे मशीन बंद आहे, केस पेपर काढण्यासाठी रुग्णांना व नातेवाईकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागते, कर्मचारी नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. या रुग्णालयातील मेडिसिन चे बजेट मागील वर्षी ९३ कोटी होते त्यात कपात करून यावर्षी फक्त ३० कोटी रूपये केले आहे. बीएमसी व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे भाभा रुग्णालयाच व्हेंटिलेटरवर आहे असे खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यावेळी त्यांच्यासोबत अर्शद आझमी, अर्शफ आझमी. बाबू खान, मोहसीन हैदर, सुभाष भालेराव, अझमत खान आदी उपस्थित होते.
साबळे नगर रेल्वे कॉलनीतील धोकादायक इमारतींत दुर्घटना झाल्यास रेल्वे, बीएमसी, सरकार जबाबदार!
साबळे नगर रेल्वे कॉलनीच्या चार ते पाच इमारती कित्येक वर्षापासून रिकाम्या आहेत, या सर्व इमारती धोकादायक असून मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारती पाडण्यात याव्या ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या इमारतीच्या आजुबाजूला अत्यंत दाट वस्ती असून पावसाळ्यात या इमारती कोसळण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्या अन्यथा पावसाळ्यात या इमारती कोसळून काही मोठी दुर्घटना घडली तर त्यास राज्य सरकार, रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
Marathi e-Batmya