Breaking News

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, इर्शाळवाडी दुर्घटनेची सविस्तर माहिती ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती

रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीतल्या ठाकूरवाडीवर रात्री झोपेत असलेल्या आदिवासांच्या वाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला. गतवर्षी रायगड जिल्ह्यातीलच माळीण येथे अशीच दुर्घटना घडून अनेकांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसानंतर गावात दरड कोसळल्याची ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये जवळपास २५ ते ३० घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. या घरांमधील जवळपास १०० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत, बंदरविकास मंत्री दादा भुसे आदी मंत्रीही त्या ठिकाणी उपस्थित आहेत.

यासंदर्भातील मुद्दा सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. त्यावर या घटनेची आणि आतापर्यंत केलेल्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी ही वाडी आहे. येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे मानवली गावातून पायी चालत जावं लागतं. वाडीत ४८ कुटुंबं वास्तव्यास असून तिथली लोकसंख्या २२८ इतकी आहे. इथे गेल्या तीन दिवसांत ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बुधवारी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. ११.३० वाजता जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली. १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर तिथे तात्काळ प्रशासनाचे लोक पोहोचले. तिथली भौगोलिक परिस्थिती पाहता इर्शाळवाडी ही खूप छोटी वाडी आहे. दुर्गम डोंगरावर डोंगरकपारीत वसलेली ही वाडी आहे. तिथे वाहन जायला रस्ता नाही. तिथे दूरध्वनी, मोबाईल पोहोचणं कठीण आहे. ठाकर या आदिवासी लोकांची इथे प्रामुख्याने वस्ती आहे. हे ठिकाण संभाव्य दरडप्रवण ठिकाणांच्या यादीत समाविष्ट नाही. यापूर्वी या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईपासून ८० किमी अंतरावर असलेल्या या गावी जाण्यासाठी चोख मानवली गावातून चालत जावं लागतं. ही वस्ती तीव्र उतारावर असल्याने दैनंदिन दळणवळणाच्या प्रमुख रस्त्याने जोडलेली नाही. या वाडीत वास्तव्यास असणाऱ्या ४८ कुटुंबांपैकी २५ ते २८ कुटुंबं बाधित झाल्याचा अंदाज आहे. २२८ पैकी ७० नागरिक घटनेवेळी सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. तर २१ लोक जखमी असून १७ लोकांवर तात्पुरत्या स्वरूपातील उपचार करण्यात आले आहेत. सकाळी १०.१५ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स सज्ज आहेत. परंतु खराब हवामानामुळे उड्डाण होऊ शकत नाहीये. सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी आहे. जेसीबीसारखी यंत्रणा वर नेता येत नसल्यामुळे अकुशल मजुरांच्या साहाय्याने बचावकार्याचे प्रयत्न चालू आहेत. एनडीआरएफचे १५० तर ५०० अकुशल मजूर घटनास्थळी बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहेत. माती, दगडांचा ढिगारा, तीव्र उतार, चिखल आणि मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकर्स, जवान आणि सिडकोने पाठवलेले मजूर यांच्यामार्फत बचावकार्य सुरू आहे. यासह स्नायफर डॉग स्क्वाड घटनास्थळी पोहोचल्याचे सांगितले.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *