Breaking News

भंडारा रूग्णालय दुर्घटनेच्या चौकशीसाठी या डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन तीन दिवसात अहवाल सादर करणार

नागपूर : प्रतिनिधी

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज  सांगितले.

बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर टोपे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल. या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत.

स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याची कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल असे सांगून टोपे म्हणाले की, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली आहे. या घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उप संचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली

त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *