Breaking News

शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना ६ लाख कोटींचा फटका बाजार १४०० अंकानी कोसळला

मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटमुळे शुक्रवारी देशातील शेअर बाजारात हाहाकार माजवला. सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार आपटले.BSE सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी कोसळला. यामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल ६ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.
सकाळी सेन्सेक्स ५४०.३ अंकांच्या घसरणीसह ५८,२५४.७९ वर उघडला. त्यानंतर ही घसरण तब्बल १,४८८ अंकांपर्यंत गेली. दुसरीकडे, निफ्टीमध्येही आतापर्यंत ४४८.०५ अंकांची घसरण झाली आहे. तज्ञांच्या मते, कोविड-19 च्या नवीन प्रकारामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या भीतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या सेन्सेक्स १४६९.२३ अंकांनी घसरून ५७,३२५.८६ अंकांवर आणि निफ्टी ४५५.५५ अंकांनी घसरून १७,०८०.७० अंकांवर व्यवहार करत आहे.
वाहन कंपन्यांचे शेअर्सला सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वांत जास्त घसरण टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये नोंदवली गेली. टाटा मोटर्सचा शेअर्स ५.३३ टक्के घसरून ४६६ वर आला. तर मारुती कंपनीच्या शेअरमध्ये ४.१७ टक्के, तर ओएनजीसीच्या शेअरमध्ये ४ टक्के घसरण पाहायला मिळाली. टाटा स्टीलचा शेअर्स ३.८५ टक्के घसरला.
युरोपात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. युरोपातले अनेक देश विमानांच्या उड्डाणांवर बंधनं घालण्याच्या तयारीत आहेत. त्याचा परिणाम देशातील शेअर बाजारांवर झाला. हवाई प्रवासावर निर्बंध येणार असल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यामुळे आशियातल्या अनेक शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. जपानचा निक्केई २२५ मध्ये ८०० हून अधिक अंकांची घसरण झाली. ऑस्ट्रेलियाच्या एस अँड पी एएसएक्स २०० मध्येही मोठी घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार १२८ अंकांनी घसरला होता. शांघाय कंपोझिट इंडेक्स ०.६ टक्क्याने घसरून ३,५६२.०९ अंकांवर आला.
शेअर बाजार कोसळण्याची तीन कारणे
नवीन कोविड प्रकार
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सापडला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर, भारत सरकारच्या आरोग्य सचिवांनी निर्देश जारी केले आहेत की भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोनाची सखोल चाचणी करावी.
FII विक्री
NSE कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) देशांतर्गत समभागांमध्ये २,३००.६५ कोटी रुपयांची विक्री केली आहे. ही विक्री देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (DIIs) खरेदीपेक्षा जास्त आहे. या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साहही ओसरला आहे.
आशियाई बाजारातील कमकुवत संकेत
सर्व आशियाई बाजारांमध्येही घसरणीचा कल असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही होत आहे. SGX निफ्टी, निक्केई, स्ट्रेट टाइम्स, हँग सेंग, तैवान वेटेड, कोस्पी, शांघाय कंपोझिट सर्व १-२% घसरले.

Check Also

ओला कंपनीच्या डिझाईनमध्ये बदल, भावीश अग्रवाल यांनी दिली माहिती नवे डिझाईनची एक्सवरून दिली माहिती

ओला कंपनीने आपल्या वाहन सेवेत काही बदल करण्याचे निर्णय घेतले. तसेच ओलाच्या विस्तारासाठी लवकरच आयपीओही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *