Breaking News

मुख्य सचिव म्हणाले, योजना पुढे ढकला, बदल्याही करायच्या नाहीत शासनाच्या सर्व विभागांना आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व विभागांनी नव्या योजना आणूच नये असे सांगत जितक्या म्हणून योजना आणि त्यावरील खर्च पुढे ढकलता येईल तितका पुढे ढकला असे सांगत कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याची बदली न करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व प्रशासनाला दिले. यासंदर्भातील आदेश आजच जारी करण्यात आला.
आर्थिक घडी विस्कटल्याने आणखी २ ते ३ महिने अशीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत. यापार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त वेतन यासाठीच मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेवून शक्य होतील तितक्या योजना पुढे ढकल्याव्यात. तसेच त्यावरील खर्चही थांबवून तो खर्च ही पुढे ढकलावा. याशिवाय नव्याने कोणत्याही योजना, नोकर भरती करण्याचा विचार कोणत्याच विभागाने करायचा नाही असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
याशिवाय एखाद्या योजनेवरील खर्च करायचाच असेल तर त्या खर्चास वित्त विभागाची मंजूरी घेतल्याशिवाय तो खर्च करायचा नाही. तसेच खर्च न झालेल्या रकमेचा आढावा घेण्यात येत असून प्रत्येक विभागाने त्यासंबधीची माहिती वित्त विभागाकडे सादर करावी असे आदेश देत अनेक विभागांनी प्रशासकिय इमारती उभारण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत असतील तर आता पुढील आदेश होईपर्यत कोणत्याच इमारतीचे बांधकाम हाती घ्यायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे निर्णय फक्त आरोग्य विभागाला लागू होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या काळात प्रत्येक ठिकाणी कर्मचारी-अधिकारी यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याची बदली करायची नसल्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

Check Also

एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत मोठी घोषणा २६ एप्रिलपासून मॅन्युफॅक्चरींग फंड बाजारात

एचडीएफसी HDFC म्युच्युअल फंडाने २२ एप्रिल रोजी HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. ओपन-एंडेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *