Breaking News

नानाजी देशमुख कृषी संजीवनीच्या पहिल्या टप्प्यात १०११ गावांची निवड कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी

नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १०११ गावांची निवड करण्यात आली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषी मंत्री  पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. या प्रकल्पाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. प्रकल्पाबाबत आढावा बैठक यावेळी घेण्यात आली.

याबाबत माहिती देतांना कृषिमंत्री म्हणाले, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील १५ जिल्ह्यातील १५५ तालुक्यातील ५१४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी ९३२ खारपाण पट्ट्यातील गावे आहेत. त्याचा फायदा १७ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. प्रथम टप्प्यात निवडलेल्या गावांमध्ये उस्मानाबाद जिल्हयातील ४३, अमरावती २१०, बुलढाणा ९१, यवतमाळ ५४, वर्धा १०, अकोला ८९, वाशिम २९ अशा १३१ गावसमूहातील १०११ गावांची निवड करण्यात आली आहे.

प्रकल्पासाठी गावांचे सूक्ष्म नियोजन, ग्राम कृषी संजीवनी समिती, खारपान जमिनीचे प्रश्न याबाबत यावेळी चर्चा झाली.

प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विकास रस्तोगी यांनी सादरीकरण केले. यावेळी प्रकल्पाच्या माहिती पुस्तिकेच प्रकाशन मंत्री फुंडकर आणि राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *