मुंबई: प्रतिनिधी
खरीप हंगामातील पिक विमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या समाधानकारक पावसाअभावी अनेक भागात कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा पेरा ५० टक्केही झालेला नाही तर काही भागात पेरण्याचे प्रमाण ५० टक्क्यां पेक्षाही कमी आहे. समाधानकारक पावसाअभावी शेतकरी संकटात आहे.तसेच पीक कर्जाचे वाटपदेखील सध्यस्थितीत ५० टक्क्याहून कमी झालेले असल्यामुळे पीक विमा हप्ता भरण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. राज्यातील लाखो शेतकरी अजनूही पीक विम्याचा हप्ता भरण्यापासून वंचित आहेत. जुलै महिन्याअखेरीस पीक विमा भरण्याची मुदत संपत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला नाही हे लक्षात घेऊन त्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून द्यावी अन्यथा मोठ्या संख्येने शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहतील अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विदर्भात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भात (धान) उत्पादक शेतकऱ्यांसाठी पिक विमा हा फक्त धानपिकाची लावणी झाल्यानंतरच स्विकारला जातो. रोपे (पऱ्हे) टाकल्यानंतर पिक विमा लागू करणे आवश्यक असताना धान (भात) या एकमेव पिकासाठी हा जाचक नियम लावल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने पिक विम्याच्या लाभापासून वंचित रहात आहेत. हा निकष बदलून रोपे (पऱ्हे) टाकल्यापासूनच पिक विमा लागू करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Marathi e-Batmya