Breaking News

पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे खोटे पत्र प्रसारित केल्याबद्दल प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आचार संहिता व काय़दा विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.अखिलेश चौबे यांनी ही माहिती बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भाजपाच्या खोट्या लेटरहेडवर व्हायरल करण्यात आलेले हे पत्र म्हणजे दोन पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला कट असल्याचेही ॲड. अखिलेश चौबे यांनी सांगितले. प्रदेश भाजपा कायदा प्रकोष्ठचे संयोजक ॲड. शहाजी शिंदे, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.

अखिलेश चौबे यांनी सांगितले की, पालघर मतदारसंघासाठी प्रकाश निकम यांना भाजपातर्फे उमेदवारी दिल्याचे पक्षाचे केंद्रीय कार्यालयाचे बनावट पत्र समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्याचे कळताच आपण त्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भाजपाच्या बनावट लेटरहेडवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याचे पत्र प्रसिद्ध करून भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला हा कट असून त्याची कसून चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे.

पालघर लोकसभा जागेसाठी अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नसताना जाणूनबुजून खोटे पत्र व्हायरल करून महायुतीच्या भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये नाहक तेढ निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न हाणून पाडू असेही चौबे यांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468 आणि 417 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आल्याचे ॲड. अखिलेश चौबे यांनी सांगितले.­­

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *