Breaking News

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनी महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी ८० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.

महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीने इच्छा व्यक्त केली. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वता मान्यता दिली. याबाबत जागा निश्चिती, उर्वरित जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यातील हजारो तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रंजन धर यांनी कंपनीची गुंतवणुकीविषयीची माहिती दिली. ही कंपनी आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देणारी असून कंपनीने कोविडमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. भारतात स्टील उत्पादन वाढीसाठी कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. खोपोली, तळेगाव, सातारडा (सिंधुदुर्ग) येथे कंपनीमध्ये हजारो तरूणांना रोजगार मिळाला आहे. आणखी हजारो तरूणांना रोजगार मिळणार असून कंपनी शिक्षण, आरोग्य, विमानतळाच्या पायाभूत सुविधामध्येही काम करणार असल्याचे धर यांनी सांगितले.

बैठकीला वाहतूक आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह, अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. चे विक्री संचालक आलेन लेगरीस, रंजन धर, ऋषिकेश कामत, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, कंपनीचे राजेंद्र तोंडापूरकर आदी उपस्थित होते.

Check Also

सात महिन्यातील कच्चे तेल एकट्या एप्रिल महिन्यात रशियाकडून आयात ७ महिन्यातील उच्चांक ठरावा इतके कच्च्या तेलाची आयात

खाजगी रिफायनर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि Rosneft-समर्थित Nayara Energy यांनी एप्रिल २०२४ मध्ये रशियाकडून सुमारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *