Breaking News

शरद पवारांना राज ठाकरेंचे प्रतित्तुर म्हणाले, अर्थ समजावून सांगा पुण्यातील मुलाखतींचा संदर्भ देत पत्रकार परिषदेत दिले उत्तर

मुंबई: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढल्याचा जाहीर आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रबोधनकारांच साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. पवारांच्या त्या सल्ल्यावर राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं असे प्रति आव्हानही पवारांना दिले. एका चॅनलला मी मुलाखत दिली. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावलं आणि गमावलं याचा उहापोह त्यात होता. मी त्यांना हेच सांगितलं की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती असे त्यांनी सांगितले.

जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, या शरद पवारांच्या सल्ल्याचा अर्थच कळला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही असं करता येणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार देखील मी वाचले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातच काही वर्षापूर्वी शरद पवारांच्या घेतलेल्या एका जाहीर मुलाखतीचा देखील संदर्भ देत म्हणाले की, मी त्यांना त्या मुलाखतीत विचारलं होतं की महाराष्ट्राचा असा एक हुक कोणता आहे, ज्याद्वारे सगळे एक होतात, एकत्र येतात? ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज. मग मी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज हेच जर आहेत, तर तुमच्या भाषणात तुमचा पक्ष शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? असा सवाल त्यांना विचारला होता त्यावर मूळ विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असल्याचे उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झाल्याचे ते म्हणाले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *