Breaking News

शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेत्यांसह या गटातील व्यक्तींना आर्थिक मदत द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत हे घटकही प्रभावित होणार असल्याने त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

राज्यात कोरोना महामारीची भयंकर स्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे, त्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत आहे. लोकांचे जीव वाचविणे ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे आपल्यासोबत उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता आपण पॅकेज जाहीर केले आहे, त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले मनस्वी स्वागत आहे. मात्र या पॅकेजमध्ये अजून काही घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका राहणार असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले.

संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठया प्रमाणावर होत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे आणि या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *