Breaking News

कोविडच्या सामन्यासाठी ५ हजार वैद्यकीय अधिकारी १५ हजार नर्सेस उपलब्ध वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोविड-19 चा मोठया प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार ५ हजार २०० वैद्यकीय अधिकारी आणि १५ हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या २० एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या १५ हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या – त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील.

राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठया प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी कोविड सेंटर, त्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रणा उभी करण्यात आल्यानंतरही आवश्यक असलेल्या डॉक्टर, नर्सेस कोठून आणायच्या असा प्रश्न सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून उपस्थित केला जात होता. तसेच या प्रश्नांचे उत्तर काही केल्या मिळत नव्हते. अखेर त्यावर वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी उत्तर शोधल्याने कोविडचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस यांच्या परिक्षा याच महिन्यात संपणार असून त्यांना इंटर्नशीप पूर्ण झालेल्या नर्सेस उपलब्ध होणार आहेत. तर ५ हजार डॉक्टरही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्याला जाणविणारा डॉक्टर, नर्सेसचा प्रश्न सुटण्यास आता मदत होणार आहे.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *