Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यदांचा हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. डॉ यशवंत मनोहर यांनी मराठी साहित्यात सातत्याने कसदार लेखन केले आहे. समाजातील नाकारलेल्या माणसांच्या जगण्यातला उद्वेग, आशय – अभिव्यक्ती मांडणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या १९७७ साली प्रकाशित झालेल्या ‘उत्थान गुंफा’ या पहिल्याच कवितासंग्रहाची वाङ्मयजगतामध्ये विशेष दखल घेतली गेली.

डॉ यशवंत मनोहर त्यांच्या साहित्यातून मानवतावादी दृष्टीकोन आणि संविधानातील मूल्यजागर स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी डॉ यशवंत मनोहर यांचे अभिनंदन केले असून या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ही केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ दिला जातो.

या पुरस्काराची सुरुवात १९९० पासून झाली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके, ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, प्रा. एन.डी. पाटील, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया आदी मान्यवर साहित्यिक आणि संस्थांना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.

Check Also

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे नाटक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाट्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *