मराठा समाजाला कुणबी समाजाचे आरक्षण देण्याचा मुद्दा गाजत असतानाच राज्याचे महसूलमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज सोलपुरात धनगर समाजाच्या आरक्षणावरून या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने विखे पाटील यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगावर भंडारा टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सुरक्षा यंत्रणेत याला ताब्यात घेतले. तरी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नका असे निर्देश प्रशासनाला दिले.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या राज्याच्या राजकारणात गाजत आहे राज्य सरकार हे आंदोलन अत्यंत संयमाने हातळले असतानाच सोलापूर दौऱ्यावर आलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोलपूर शासकीय विश्रामगृहात राधाकृष्ण विखे पाटील आले. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे निवदेन वाचत असतानाच बेसावध असलेल्या विखे पाटील यांच्या अंगावर त्याने खिशातील भंडार उधळला अकस्मात झालेल्या या प्रकरणे गोंधळ उडाला. मात्र सुरक्षा यंत्रणेने त्वरित सतर्कता दाखवत या तरुणाला ताब्यात घेतले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र हा विषय सयंमाने हाताळला आहे . श्री देव खंडोबाराया यांच्या पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. तेव्हा भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. आरक्षण हा विषय संवेदनशील असून प्रश्न चर्चेने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच धनगर आरक्षणासंदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील आहे अशा भावना विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या .
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, राज्यातील कोणत्याही समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सरकारमधून नेहमीच सकारात्मक विचार करतो, याही पुढे जाऊन सांगतो आपल्या मागण्यांसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळासमोर जाऊन आपल्या समस्या, आपला आवाज तिथे प्राधान्याने मांडेन. प्रश्न कोणताही असो तो चर्चेने आणि संवादाने सोडवता येतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. याचसाठी माझा मतदार संघ असो, मंत्रालय असो की पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्हा असो, त्या त्या ठिकाणी येऊन भेटणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेळ देऊन त्यांची भेट घेतो. त्यांच्या समस्या समजावून घेत असतो. त्यावर प्राधान्याने उपाय योजना करणे, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो.
राधाकृष्ण विखे-पाटील पुढे म्हणाले, आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथेही मी तसेच धनगर आरक्षणासंदर्भातील कृती समितीच्या सदस्यांना वेळ दिला, त्यांचे निवेदन घेत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला. मात्र अनपेक्षितपणे जो काही अनुचित प्रकार झाला, यामुळे एकप्रकारे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये एवढी भूमिका माझी आहे. भंडारा उधळणे ही कृती चुकीची नाही, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे, पण पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. त्यामुळेच भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, गुन्हे दाखल करू नयेत, असे आदेश मी दिला.