भाजपाच्या अमरावती बंदला हिंसक वळण: पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात जमावाकडून अनेक दुकानांच्या फलकांची, ठेल्यांची तोडफोड

अमरावती-मुंबई: प्रतिनिधी

त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ काल काहीजणांनी अमरावतीत मोर्चा काढत हिंसा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्यावतीने अमरावती बंदची घोषणा केली. मात्र आज सकाळपासूनच शहराच्या राजकमल चौकात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला आणि त्याने सुरुवातीला रस्त्यावरील ठेल्यांची नासधुस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाजारपेठेत जावून दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी अनेक दंगलखोरांना अडविल्याने तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगविले.

सुरुवातीला हा मोर्चा राजकमल चौकातून निघून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार होता. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून संपणार होता. तसेच आज अमरावती बंदची घोषणा केल्यामुळे संध्याकाळी ४ वाजेपर्यत शहरातील दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आले होते.

परंतु सकाळपासून मोठ्या प्रमाणावर जमाव राजकमल चौकात जमा होवून जमावाकडून नासधुस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाने गांधी चौकातील दुकांनावरही दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक दुकांनांच्या फलकांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी बंद असलेल्या दुकांनावर दगडफेक करून नुकसान करण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला. परंतु त्यावेळी एक महिला पोलिस अधिकारी आणि अन्य एक पोलिस अधिकाऱ्यांनी जमावाला रोखून नुकसान तोडफोड करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर गांधी चौक परिसरातच एका रिक्षाने काही महिला प्रवास करत होत्या. त्यावेळी जमावाने रिक्षाला अडवून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे एक महिला पोलिस अधिकाऱ्याने जमावाला रोखत रिक्षा चालकासह त्यातील प्रवाशांना सुखरूप परत पाठवून दिले.

अखेर या भागातील जमाव ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दगंलखोरांनी तेथून पळ काढला पण पुन्हा हे दंगलखोर राजकमल चौकात आणखी जमा झालेल्या गर्दीत सहभागी झाले. त्यानंतर तेथील एका चहाच्या ठपरीचे नुकसान दंगलखोरांनी केले. येथेही पोलिसांनी दंगलखोरांना शांत राहण्याचा प्रयत्न केला. परंतु दंगलखोर ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी पुन्हा येथील दंगलखोरांना लाठीमार करत हुसकावून लावले. तर काही ठिकाणी दंगलखोर आणि पोलिसांमध्ये वादावादीच्या घटनाही घडल्या. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचे फवारे मारून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने अखेर पोलिस प्रशासनाकडून १४४ कलम लागू करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे अमरावतीत तणावपूर्ण शांतता निर्माण झाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *