Breaking News

उध्दव ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेना प्रत्युत्तर, मीच केलय…अरे नाही बाबा समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनानंतर ठाकरे यांनी केली शिंदेवर टीका

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून मोठा वाद चालू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणतीच भूमिका मांडत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतरही बसवरा बोम्मईंनी “यानं काही होणार नाही, एक इंचही जमीन देणार नाही”, अशी आडमुठी भूमिका घेतली. यावरून आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदींसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणांमधून त्यांनी समृद्धी महामार्गाचं काम रखडण्याला आधीचं ठाकरे सरकार कारणीभूत असल्याची टीका केली होती. यावरूनही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

उध्दव ठाकरे म्हणाले, मोदींनी आज विकासकामांचं लोकार्पण केलं. त्यात काहीजण म्हणाले की ‘हे मीच केलंय’. अरे नाही बाबा. सरकार येत-जात असतं. आजपर्यंत महाराष्ट्रात किती मुख्यंमत्री होते, यापुढेही किती होणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते होते तेव्हाच काम झालं, याच्या आधी झालं नाही आणि यापुढेही होणार नाही. त्यामुळे कुणी हा समज करून घेऊ नये की ते म्हणजेच सर्वकाही. असं नाहीये. तो समज काहीजणांचा झाला आहे असा खोचक उत्तर दिले.

महाराष्ट्राची अवहेलना सातत्याने सुरू आहे. आपण शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपतींचा महाराष्ट्र असं आपण म्हणतो. पण त्यांचाच अपमान करणारा माणूस आमच्या राज्यपालपदावर बसलेला असेल आणि तोच माणूस आजही पंतप्रधानांसमवेत व्यासपीठावर  असेल तर महाराष्ट्रानं समजायचं काय? असा सवालही उद्धव ठाकरें यांनी केला.

महाराष्ट्राच्या बाजूने कुणीच बोलत नाहीये. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत आणि माज आल्यासारखे बोलत आहेत. आमचे मुख्यमंत्री त्यांना लिहून दिलीये तेवढीच स्क्रिप्ट वाचतात. म्हणतात सर्वोच्च न्यायालयात तो विषय आहे. मग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट जशी महाराष्ट्र बघतोय, तशी कर्नाटकने बघायला काय हरकत आहे. पण तिथे प्रकरण प्रलंबित असताना हे बेळगावला उपराजधानीचा दर्जा देत आहेत आणि डोक्यावरून पाणी गेलं तरी आम्ही थंड राहिलो आहोत. महाराष्ट्राला कुणी वाली आहे की नाही? असा सवाल विचारत मुख्यमंत्री फक्त दिलेलं स्क्रिप्ट बोलून दाखवितात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

केंद्रात, कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे. महाराष्ट्रातील सरकार भाजपाचेच मिंधे आहेत. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे नेतेही एकच आहेत, नरेंद्र मोदी मग बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? बोम्मई म्हणतात अमित शाहांना भेटून काही होणार नाही. पंतप्रधान महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत की नाही? असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना केला.

त्याचवेळी हा महामार्ग जवळपास २०० किमी तयार होता. मी तेव्हाच म्हटलं होतं की जेवढा तयार झालाय, तेव्हा जनतेला वापरायला मोकळा करून द्यायला हवा. पण हरकत नाही. आज याला मुहूर्त लागला आहे. कुणाच्या का हस्ते असेना. हा करदात्यांचा पैसा आहे. त्यामुळे कुणीही हा त्यांनी केलाय, असं समजू नये. यासाठी जनतेनं सहकार्य केलं नसतं, तर हा महामार्ग झाला नसता, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *